आईची पायपीट थांबण्यासाठी विहीर खोदणाऱ्या प्रणवला घरकुल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 05:41 AM2023-05-05T05:41:27+5:302023-05-05T05:41:48+5:30
जिल्हा परिषदेमार्फत सत्कार; पोलिस अधिकाऱ्याने घेतली शिक्षणाची जबाबदारी
पालघर : डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठीची आईची पायपीट थांबविण्यासाठी सलग चार दिवस मेहनत करून विहीर खोदणारा केळवे येथील विद्यार्थी प्रणव सालकरची जिल्हा परिषदेने दखल घेतली आहे. स्थायी समिती सभेत त्याचा सत्कार करून त्याच्या कुटुंबाला घरकूल मंजूर करण्याचे आदेश अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिले आहेत. प्रणवची भेट घेण्यासाठी गुरुवारी त्याच्या घरी अनेक अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आले होते. सर्वजण त्याचे कौतुक करत होते.
प्रणव सालकर हा पालघरच्या केळवे येथील धावंगेपाडा गावचा रहिवासी असून, सध्या नववी इयत्तेत शिकत आहे. आपल्या आईचे कष्ट वाचविण्यासाठी त्याने घराच्या समोरच अंगणात विहीर खोदली. पाण्यासाठी कुठल्या मुलाला अशी विहीर खणावी लागू नये, यासाठी २०२४ पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली. त्यांनी प्रणवला रोख ११ हजारांचे बक्षीस देऊन शबरी आवास योजनेमधून त्याच्या वडिलांना तत्काळ घरकूल मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, सर्व समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्य मिळाल्याने आनंद
आईच्या वेदना पाहून दिवस-रात्र मेहनत घेत २० फुटांची विहीर खोदणाऱ्या प्रणवच्या कर्तबगारीची दखल केळवे सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी घेतली आहे. त्यांनी त्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलली आहे. त्याला वह्या, पुस्तके, युनिफॉर्म, शूजसह शैक्षणिक साहित्य देण्यात आले. नवीन पुस्तके, शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्याचा आनंद त्याच्या निरागस चेहऱ्यावर दिसत होता.
आपल्या वेदनेची जाण ठेवून आपले श्रम वाचावेत, अशी त्याची इच्छा होती. यासाठी आपल्या एकुलत्या एक मुलाने घेतलेल्या परिश्रमाचे कुठलेही मोल होऊ शकत नाही. - दर्शना सालकर, प्रणवची आई