जुनी जव्हार ग्रा.पं.मध्ये घरकुल घोटाळा; पाच लाभार्थ्यांची नावे मंजूर, मात्र त्यांना प्रत्यक्षात घरकुले दिलीच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:22 AM2017-12-12T03:22:43+5:302017-12-12T03:23:03+5:30
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश जारी झालेले असतांनाच जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील कशीवली नं. २ येथील रहीवासी गोविंद भाऊ भुसारा व त्यांचे सोबत ४ लाभार्थी अशा एकूण पाच लाभार्थ्यांना घरकूल न देता त्याचे मंजूर झालेले पैसे परस्पर काढून घेतल्याची बाब उघडकीस आली असून, या लाभार्थ्यांनी पंचायत समिती व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर यांना तक्रार केलेली आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश जारी झालेले असतांनाच जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील कशीवली नं. २ येथील रहीवासी गोविंद भाऊ भुसारा व त्यांचे सोबत ४ लाभार्थी अशा एकूण पाच लाभार्थ्यांना घरकूल न देता त्याचे मंजूर झालेले पैसे परस्पर काढून घेतल्याची बाब उघडकीस आली असून, या लाभार्थ्यांनी पंचायत समिती व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर यांना तक्रार केलेली आहे.
सन २०१७-१८ मध्ये जुनी-जव्हार ग्रामपंचायत पैकी कशिवली नं. २ येथील सुशिला रविंद्र भोये, सुरेश मावंजी भोये, गोविंद भाऊ भुसारा, दशरथ रामा चौधरी व सुरेश रामा चौधरी या पाच लाभार्थ्यांना इंदिरा आवास व पंतप्रधान आवास योजनेतून गोविंद भाऊ भुसारा व दशरथ रामा चौधरी या दोघांना घरकूल योजनेचा लाभ देऊन घरकूल पूर्ण करून देण्यात आलेले असल्याची दप्तरी नोंद करण्यात आलेली आहे. मात्र या दोन्ही लाभार्थ्यांना प्रत्यक्षात घरकूल योजनेचा लाभच मिळालेला नसल्याची लेखी तक्रार करण्यात आली आहे.
तसेच ग्रामपंचायतीत योजनेतून ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहेत ती संपूर्ण बोगस असून त्यांची पक्की घरे आहेत अशा लाभार्थ्यांना त्याच त्याच कुटुंबातील लाभार्थी शेतातील कुडा मातीच्या घरात राहत असल्याचे दाखवून लाभ दिलेला आहे. यामध्ये पंचायत समितीचे कर्मचारी व ग्रामसेवक, सरपंच यांच्या संगनमताने संपूर्ण कागदपत्रे बोगस दाखवून लाभार्थी निवड करण्यात आलेली आहेत. त्यामुळे जुनी-जव्हार ग्रामपंचायतीच्या घरकूल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत संबंधित कर्मचारी स्वप्नील इंगोळ यांना विचारणा केली असता, गोविंद भाऊ भुसारा यांच्या वडलांच्या नांवे घरकुल मंजूर
केलेले आहे, त्यामुळे एका कुटुंबातील दुसºया व्यक्तीला लाभ देता येत नाही, तरी याबाबत गट विकास अधिकाºयांकडून अधिक माहिती घ्या असे लोकमतच्या वार्ताहराला सांगण्यात आले.
माझ्याकडे घरकूल योजनेच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, माझ्या कडे इतरही ग्रामपंचायतीच्या चौकशा असल्यामुळे अजून मी जुनी-जव्हार ग्रामपंचयतीची तपासणी केलेली नाही, लवकरच चौकशी करण्यात येईल.
- मधुसूदन गवळी,
इंदिरा आवास योजना विस्तार अधिकारी,
पं. समिती जव्हार