ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; पालिकेकडून घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 10:02 PM2018-05-28T22:02:29+5:302018-05-28T22:02:29+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने गणेश देवल नगरमधील सार्वजनिक शौचालयासाठी लोखंडी टाकी बसवण्याचे कंत्राट दिले होते.
मीरारोड - महापालिका शौचालयाची लोखंडी टाकी बसवताना विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या 8 वर्षाच्या बालिकेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी पालिकेकडून संबंधित ठेकेदाराची माहिती तसेच कामाच्या कार्यादेशाची प्रत देण्यास टाळाटाळ केली जात आहे . पालिकेला लेखी पत्र देऊन जर त्यांनी माहिती दिली नाही तर कायदेशीर नोटीस देण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने गणेश देवल नगरमधील सार्वजनिक शौचालयासाठी लोखंडी टाकी बसवण्याचे कंत्राट दिले होते. गेल्या मंगळवारी २२ मे रोजी लोखंडी टाकी बसवण्यासाठी वेल्डिंग आदी काम सुरु होते . परंतु या कामासाठी दुसरी कडून वीज पुरवठा घेण्यात आला होता . परंतु वीज पुरवठ्याची केबल ही उघड्यावरून घेताना ती सदोष असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले .
परिणामी काम सुरु असतानाच नाझरीन शेख हि आठ वर्षाची मुलगी खेळत असताना तिचा सदोष केबलशी संपर्क झाला व विजेच्या धक्क्याने ती मरण पावली. ठेकेदाराच्या निष्काळजीपणा नाझरीनच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी देखरेख करणारा मोतीराम राजकुमार विश्वकर्मा व महापालिका ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला .
पण पोलिसांनी या प्रकरणी मीरा भाईंदर महापालिके कडे सदर कामाचा ठेकेदार व त्याला दिलेल्या कार्यादेशाची माहिती मागितली असता ती देण्यास पालिकेने टोलवाटोलवी चालवली आहे . आठवडा झाला तरी पालिका माहिती देत नसल्याने उपनिरीक्षक नाजुका पाटील या स्वतः उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांना भेटल्या . पण हाती काहीच लागले नाही . गुन्ह्याच्या तपासात पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने आता पत्र देऊन देखील जर पालिकेने माहिती दिली नाही तर कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेच्या संबंधित विभागास नोटीस द्यावी लागेल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.