बोईसरमध्ये भरदिवसा प्रेयसीला घातली गोळी, तरुणाचीही आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 11:00 AM2022-09-29T11:00:00+5:302022-09-29T11:00:16+5:30
बोईसर येथे एका तरुणाने प्रेयसीवर गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात तिचा जागीच मृत्यू झाला.
बोईसर : बोईसर येथे एका तरुणाने प्रेयसीवर गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात तिचा जागीच मृत्यू झाला, तर गोळीबार करणाऱ्या तरुणाने एका वाहनाखाली उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गोळीबाराची ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने बोईसर परिसरात खळबळ माजली आहे. बोईसर-पालघर या मुख्य रस्त्यावरील बोईसर रेल्वे उड्डाण पुलाजवळील टीमा रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोलवडे गावात राहणाऱ्या कृष्णा यादव (वय २६) याने सरावली येथे राहणाऱ्या नेहा महतो (वय २१) या तरुणीवर सात बोअरच्या गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. त्यानंतर पळून जात असताना डी डेकोर कंपनीजवळ संरक्षण दलाच्या वाहनाखाली आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला टीमा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादारम्यान त्याचाही मृत्यू झाला.
बोईसर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांनी भेट दिली. घटनेचा तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम व सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे करीत आहेत.
आरोपी तरुणाने गोळीबारानंतर स्वत:वरही गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावठी कट्टा लॉक झाल्याने त्याने वाहनाखाली उडी मारली असता त्याच्या दोन्ही पायांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.