सिमल्यातून पळवलेल्या मुली बोईसरला सापडल्या
By Admin | Published: December 27, 2016 02:25 AM2016-12-27T02:25:46+5:302016-12-27T02:25:46+5:30
शिमल्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींसह एक मुलगा पालघरच्या गुन्हे शाखेला सापडला असून,त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
विरार : शिमल्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींसह एक मुलगा पालघरच्या गुन्हे शाखेला सापडला असून,त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पेट्रोलींग करीत असताना पालघरच्या बोईसर युनीटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या स्टाफला भाजी मार्केट परिसरात दोन मुली आणि एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता,हिमाचल प्रदेशातील सिमला येथील असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,याबाबत ठोस स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही. त्यामुळे ठाकूर यांनी सिमला पोलीसांशी संपर्क साधला असता, लोअरबाजार सिमला येथील गोपाल शर्मा यांची मुलगी मीनाक्षी, तीची मैत्रीण प्रीती आणि मित्र उदित यांचे अपहरण झाले असल्याची माहिती त्यांना मिळाली. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून ओळख पटवल्यानंतर सिमला पोलिसांनी या तिघांच्याही पालकांशी संपर्क साधून त्यांची खुशाली कळवली.
या तिघांनाही ताब्यात घेण्यासाठी सिमला पोलीस बोईसरला निघाले असून, बोईसर पोलीसांनी तिघांचीही वैद्यकिय तपासणी करून ते येईपर्यंत त्यांना बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र ठाकूर, उपनिरिक्षक निवास कणसे, हवालदार मंगेश चव्हाण,पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी, सचिन मर्दे, नरेश जनाठे यांनी हे यशस्वी तपासकार्य केले. (वार्ताहर)