मयत सभासदांच्या कुटुंबीयांना ५ लाख द्या
By Admin | Published: September 1, 2016 02:37 AM2016-09-01T02:37:13+5:302016-09-01T02:37:13+5:30
साडे दहा हजार पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या व सहकार क्षेत्रात सर्वात श्रीमंत आसलेल्या ठाणे-पालघर जिल्हा शिक्षक पतपेढीला दर आर्थिक वर्षात करोडोंचा नफा मिळतो
सफाळे : साडे दहा हजार पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या व सहकार क्षेत्रात सर्वात श्रीमंत आसलेल्या ठाणे-पालघर जिल्हा शिक्षक पतपेढीला दर आर्थिक वर्षात करोडोंचा नफा मिळतो. तसेच सभासद वर्गणी व ठेवींवर करोडो रुपयांचे व्याज मिळते आणि १०० टक्के वसूली होत असल्याने पतपेढी नफ्यात आहे.तसेच इतर राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जास्त दराने व्याज वसूल केले जाते मात्र वर्गणीच्या ठेवींवर आठ टक्के दराने व्याज दिले जाते. परंतु सभासदांना म्हणावा तेवढा लाभ मिळत नाही. तसेच एखादा सभासद मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबियांना कसलीही मदत केली जात नाही. प्रत्येक महिन्याला सभासदांच्या वेतनातून ५० रु पये कल्याण निधी जमा केला जातो.एका वर्षात जवळ-जवळ ६६ लाख रुपये या रुपाने जमा होतात. याचा विचार करुन जर एखाद्या सभासदाचे अकाली निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी व प्रत्येक सभासदांचा १० लाखांचा विमा काढावा, अशी मागणी जुन्या पेन्शन हक्क संघटनेने पतपेढी संचालकांकडे केली आहे.
मंगळवारी भिवंडी येथे ठाणे-पालघर जिल्हा शिक्षक पतपेढीची ८५ वी सभा पार पडली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरील मुद्दा उपस्थित केला. या ठरावाला उपस्थित सातशे ते आठशे सभासदांनी एकमताने मंजुरी दिली परंतु संचालक मंडळ निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. पुढील एक वर्षात आपण पतपेढीची विशेष सभा लावून या ठरावावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन अध्यक्ष देसले यांनी दिले. सभासद एकमताने मंजुरी देत असतांना शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेण्यास संचालक मंडळ का तयार नाही? असा प्रश्न शिक्षकांनी केला आहे. (वार्ताहर)