शिक्षक द्या, नाय तर मुलांना शेळ्या द्या! पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 07:37 AM2023-08-22T07:37:12+5:302023-08-22T07:37:27+5:30
शिक्षण विभाग कार्यालयात धडक देत विचारला जाब
लोकमत न्यूज नेटवर्क , वाडा (पालघर) : वाडा तालुक्यातील आब्जे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत आठ शिक्षकांची पदे मंजूर असताना सध्या फक्त तीनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे एका शिक्षकाला दोन ते तीन वर्गांत अध्यापनाचे काम करावे लागते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतापलेल्या पालकांनी सोमवारी वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ‘शिक्षक द्या, नाय तर मुलांना शेळ्या द्या’, अशी मागणी करत शिक्षण विभागाला त्यांनी जाब विचारला.
शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग येथे भरतात. १६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची रिक्त पदे लवकर भरावीत, याबाबत पालकांनी वारंवार शिक्षण विभागाकडे मागणी केलेली आहे. मात्र, प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी वाडा येथे शिक्षण विभाग कार्यालयात धडक देत जाब विचारला.
तत्काळ दिला एक शिक्षक
आब्जे ग्रामस्थ संतप्त झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत गटशिक्षणाधिकारी भगवान मोकाशी यांनी तत्काळ एक शिक्षक शाळेसाठी दिला आहे. येत्या आठ दिवसांत शाळेत सर्व मंजूर शिक्षकांची पदे न भरल्यास शाळेला टाळे ठोकू, असा इशारा ग्रामस्थ किशोर मढवी यांनी प्रशासनाला दिला आहे.