देव तारी त्याला कोण मारी...विजेचा धक्का लागून ‘ती’ तडफडत होती, ‘ते’ आले देवदूत बनून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 07:24 AM2023-07-07T07:24:28+5:302023-07-07T07:24:41+5:30
त्रिशा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शिकवणीसाठी पायी माहीम फणसबाग येथे जात होती.
पालघर : पालघर तालुक्यातील माहीम येथे खासगी शिकवणीला जाणाऱ्या माहीम-टेंभी येथील त्रिशा मेहेर या तिसरीतील विद्यार्थिनीला विजेचा धक्का लागून ती मृत्यूशी झुंज देत होती. त्याचवेळी सुहास म्हात्रे, चैतन्य वर्तक या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचविले. त्रिशावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्रिशा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शिकवणीसाठी पायी माहीम फणसबाग येथे जात होती. यावेळी रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पडलेल्या वीजवाहक तारेचा स्पर्श होऊन तिला जबर धक्का बसला. त्यानंतर ती रस्त्यावर तडफडत होती. तिच्या सोबतच्या मुलांनी घाबरून पळ काढला. यावेळी सुहास म्हात्रे यांनी तेथे धाव घेतली. प्रथम विजेच्या खांबाला लावण्यात आलेल्या फ्यूज बॉक्समधील सर्व फ्यूज काढले. परिसरातील सर्व विद्युत प्रवाह खंडित केल्याचे सुहास यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तरुणांच्या धाडसाचे कौतुक
त्यांच्यासोबत असलेल्या चैतन्य वर्तक याच्या साथीने त्यांनी रस्त्यात वीज तारांच्या विळख्यात अडकलेल्या त्रिशाला उचलून घेतले. तिच्या हात आणि पायाला जखमा झाल्या होत्या. दोघांनी तिला डॉक्टरकडे नेले व प्रथमोपचार केले. त्यानंतर माहीम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीप्ती गायकवाड यांनी सांगितले. वेळीच प्रसंगावधान दाखवीत त्रिशाचे प्राण वाचविणाऱ्या सुहास म्हात्रे, चैतन्य वर्तक यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.