‘मुलींचा जन्मदर चांगला, पण शाळाबाह्य मुलींचे प्रमाण जास्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:56 AM2021-03-09T00:56:51+5:302021-03-09T00:57:37+5:30
ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली रोजगारानिमित्त बाहेर पडताना लग्न करीत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढीस लागल्याची खंत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पालघर : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असल्याचे समाधान असले तरी शाळाबाह्य मुलींचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात ‘बेटी बचावपेक्षा बेटी पढाव’ची जास्त आवश्यकता असल्याने महिलांनी पुढे येण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, संदीप पवार, संदीप कळंबे, जिल्हा विधी अधिकारी ॲड. मनीषा पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली रोजगारानिमित्त बाहेर पडताना लग्न करीत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढीस लागल्याची खंत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सीएसआर फंडातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगून ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हातात दिल्यास कारभारात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच मुलगा झाल्यावर पेढा आणि मुलगी झाल्यावर बर्फी वाटणे हा समज दूर करून एक मुलगीच आई-वडिलांना चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकते, असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित जिल्हा विधी अधिकारी मनीषा पाटील यांनी, जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांनी एका दिवसासाठी एकत्र येण्याऐवजी वर्षाचे ३६५ दिवस एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत समाज काय म्हणेल, याकडे लक्ष देण्याऐवजी निर्णय घ्या आणि पुढे या, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थिनींना एका दिवसाचे अधिकारीपद
जव्हार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या अंतर्गत वस्तिगृहात शाळकरी मुली व कॉलेज कुमारींना महिला दिनाचे औचित्य साधून श्रेणी-२ च्या पाच अधिकाऱ्यांची जबाबदारी देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना एका दिवसाचे मानधनही देण्यात येणार आहे.
प्रकल्प कार्यालयात साहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रेणी-२ साठी शासकीय मुलींचे वसतिगृह येथील दोन विद्यार्थिनींना साहाय्यक प्रकल्प अधिकारी, तर एक नियोजन अधिकारी, एक कार्यालयीन अधीक्षक, तर एक लेखा अधिकारी अशा पाच विद्यार्थिनींना एका दिवसाकरिता कार्यालयीन आदेश देऊन एक वेगळी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तूही देण्यात आली. दरम्यान, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सामाजिक दृष्टीने कशा प्रकारे काम करीत असते, या कार्यालयाकडून आदिवासींचे जीवन उंचावण्यासाठी कशा प्रकारे योजना राबविण्यात येतात हे या मुलींना शिकविण्यात आले.