दारिद्र्यरेषेखालील गोडेंना घरकुल मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:10 AM2017-08-15T03:10:29+5:302017-08-15T03:10:32+5:30
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदातून घरकुले बांधून दिली जात आहेत.
हुसेन मेमन ।
जव्हार : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदातून घरकुले बांधून दिली जात आहेत. दारिद्र्य रेषेखालील व कुड, मातीच्या घरात राहणाºया गरिब कुटुंबांना पक्के घर मिळावे म्हणून शासनाने आदिवासी विकास शबरी महामंडळाच्या मार्फत लोकसंख्यनुसार दरवर्षी लाभार्थ्यांची निवड करून अनुदान दिले जाते. तसेच आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कातकरी (आदिम) जातीसाठी देखील घरकुल योजना आहे. ऐवढ्या योजना असल्या तरी सर्व योजनांच्या सर्व निकषांना पात्र ठरून पवारपाडा येथील गोडे कुटुंबीय घरकुलापासून वंचित आहे.
या तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत पैकी पवारपाडा गावातील दयानंद पांडुरंग गोडे यांच्या घरात पती, पत्नी, सून, नातवंड अशी एकूण सहा माणसे राहत असून त्यांचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आहे. तसेच ते स्वातंत्र्यपासून पवारपाडा येथेच राहत आहे. या कुटुंबांचा दारिद्य्र रेषेखालील नंबर ४९ आहे. पात्रता यादीत त्यांना एकूण १६ गुण मिळालेले आहेत. असे असूनही त्यांना अद्यापर्यंत कोणत्याही योजनेतून घरकुल मिळालेले नाही. त्यामुळे हे कुटुंब कुडाच्या घरात राहत आहे. सध्या हे घर वादळ,वारा, पाऊस यामुळे मोडकळीस आले आहे. त्यामुळे त्याला टेकू लावावे लागले आहेत. ते कधी कोसळेल याची शाश्वती नाही. म्हणून त्यांच्यावर गेल्या वर्षभरापासून दुसºयांच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. आजही त्याचे कुटुंब दुसºयांच्या आश्रयाला आहे.
या कुटुंबांने आजवर सर्वच घरकुल योजनांचे अर्ज भरले, विनंत्या केल्या परंतु, कोणत्याच योजनेचे ते लाभार्थी ठरले नाहीत. लाभार्थ्यांच्या यादीत अनेक बोगस आणि अपात्र घुसवले गेलेत. काहींनी घरेही बळकावलीत परंतु या पात्र कुटुंबाची मात्र घराअभावी परवड होते आहे. या कडे स्वत: जिल्हाधिकारी लक्ष देतील काय? असा सवाल त्यांनी केला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ््यांनी त्यांची निराशा केल्यामुळे नाईलाजाने त्यांनी लोकमतकडे धाव घेतली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नवे कलेक्टर अथवा जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष आपली ही समस्या सोडवतील का? असाही सवाल त्यांनी लोकमतशी बोलतांना केला.
कौलाळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा आहे. त्यामुळे त्या लाभार्थ्यांचा ग्रामसभेपुढे विषय ठेवून निर्णय घेतला जाईल. त्या लाभार्थ्यांनी त्यांची अडचण ग्रामसभेत मांडावी.
- राजेश वातास,
सरपंच,कौलाळे.
मी गेल्या मार्च महिन्यापासून कौलाळे ग्रामपंचायतीचा कार्यभार माझ्याकडे आहे. त्यामुळे मी नवीन असल्याने मला याबाबत काहीच बोलता येणार नाही. जुन्या यादीत या लाभार्थ्यांचे नाव नाही. पुढील ग्रामसभेनंतर त्याचा ग्रामसभेत ठराव घेवून त्यावर विचार करू.
- शिंदे, ग्रामसेवक,कौलाळे ग्रा.