वसई विरार मॅरेथॉनवर गोरखा रेजिमेंटचे वर्चस्व; ४२ किलोमीटर वसई विरार मॅरेथॉनमध्ये तीर्था पुन पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2023 03:11 PM2023-12-10T15:11:22+5:302023-12-10T15:11:48+5:30

तर २१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये प्राजक्ता गोडबोले व एमडी नूरहसन 

Gorkha Regiment dominates Vasai Virar Marathon; Tirtha Pun first in the 42 km Vasai Virar Marathon | वसई विरार मॅरेथॉनवर गोरखा रेजिमेंटचे वर्चस्व; ४२ किलोमीटर वसई विरार मॅरेथॉनमध्ये तीर्था पुन पहिला

वसई विरार मॅरेथॉनवर गोरखा रेजिमेंटचे वर्चस्व; ४२ किलोमीटर वसई विरार मॅरेथॉनमध्ये तीर्था पुन पहिला

-मंगेश कराळे

नालासोपारा :- स्पर्धकांचा वाढता सहभाग व वसईच्या निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा अविस्मरणीय अनुभव त्याचबरोबर गुणवान युवा धावपटूंना वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धेत चमक दाखवण्याची संधी उपलब्ध करून देणारी दहावी मॅरेथॉनस्पर्धा रविवारी वसईत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली ती गोरखा रेजिमेंटच्या (दार्जिलिंग) ४२ किमीच्या खेळाडूने. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनमध्ये गोरखा रेजिमेंटचे (दार्जिलिंग) तीर्था पुन हे प्रथम आले.

मॅरेथॉनमध्ये तीर्था पुन याने २ तास २१ मिनिटे ४८ सेकंदात  ४२ किमीची धाव पूर्ण करीत विजेतेपद पटकावले. तर २१ किलोमीटर महिला गटात प्राजक्ता गोडबोले व पुरुष गटात एम डी नूरहसन यांनी बाजी मारली आहे. समाजातील महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी सलग ११ व्या वर्षीही, "स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्ग समतोल पाळा" हे घोषवाक्य घेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. १४ हजाराहून अधिक स्पर्धकांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली.

मनपाची ११ वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी साडे पाच वाजता या स्पर्धेला सुरवात झाली होती. या स्पर्धेत  देशभरातील विविध ठिकाणचे हजारो धावपटू यात सहभागी होत ५ किमी, ११ किमी, २१ किमी, ४२ किमी अंतर पूर्ण केले. मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी विविध ठिकाणच्या मार्गावर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. यामध्ये लहान मुले, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत उपस्थितांना विविध सामाजिक संदेश दिले. या स्पर्धेत २१ किमी अर्ध मॅरेथॉन महिला गटात प्राजक्ता गोडबोले हिने प्रथम क्रमांक पटकावला तर तामसी सिंग हिने द्वितीय व फुलन पाल हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर २१ किमी पुरुष गटात एम डी नूरहसन याने प्रथम क्रमांक व पुनीत यादव द्वितीय व अरुण राठोड याने तृतीय क्रमांक मिळविला.

४२ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये तीर्था पुन याने प्रथम क्रमांक पटकावत विजेता ठरला तर मोहित राठोड द्वितीय व तडाखे चिंधू तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती पारुळ चौधरी इव्हेंट ऍम्बेसेडर म्हणून उपस्थित होती. तर सिने कलाकार महेश मांजरेकर, दत्तू मोरे, समीर चौगुले, अरुण कदम, ओमकार राऊत यांनी हजेरी लावली होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, खासदार राजेंद्र गावित, मनपा आयुक्त अनिलकुमार पवार, माजी महापौर राजीव पाटील, नारायण मानकर, प्रवीण शेट्टी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल

४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा

तीर्था पुन – २ तास २१ मिनिटे ४८ सेकंद
मोहित राठोड- २ तास २६ मिनिटे ४३ सेकंद 
तडाखे चिंधू - २ तास २८ मिनिटे ३६ सेकंद

अर्ध मॅरेथॉन स्पर्धा (पुरुष )

एम डी नूरहसन – १ तास ४ मिनिटे ४५सेकंद
पुनीत यादव -  १ तास ४ मिनिटे ४९ सेकंद
अरुण राठोड – १ तास ४ मिनिटे ५३ सेकंद

अर्ध मॅरेथॉन महिला

प्राजक्ता गोडबोले - १ तास १८ मिनिटे १२ सेकंद 
तामसी सिंग - १ तास २० मिनिटे ०९ सेकंद 
फुलन पाल-  १ तास २० मिनिटे २८ सेकंद

Web Title: Gorkha Regiment dominates Vasai Virar Marathon; Tirtha Pun first in the 42 km Vasai Virar Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.