सरकार नवउद्योजकांच्या पाठीशी - अनंत गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:14 AM2018-02-05T04:14:53+5:302018-02-05T04:14:57+5:30
देशातील तरुण हे रोजगार मागणा-यांऐवजी रोजगार देणारे व्हायला हवेत. यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक होण्याची गरज आहे.
वाडा : देशातील तरुण हे रोजगार मागणा-यांऐवजी रोजगार देणारे व्हायला हवेत. यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक होण्याची गरज आहे. याकरिता सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पत्रकारांशी बोलताना केले. हमरापूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी ते रविवारी आले होते. या वेळी आमदार भरत गोगावले, सद्गुरू दादासाहेब मोरे महाराज, शिवसेनेचे महाड विधानसभा संपर्क संघटक सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य भारती कामडी, हमरापूर ग्रामपंचायतचे सरपंच संदीप गोवारी, उपसरपंच गजानन पाटील हे उपस्थित होते.
उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र सरकार स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसाह्य दिले जात आहे. पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्याचा औद्योगिकीकरणाद्वारे विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या भागात उद्योग उभारणाºया उद्योजकांच्या पाठीशी सरकार उभे आहे. स्टार्ट अप इंडिया आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नवउद्योजकांना कारखाने उभारण्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरकार करीत आहे. उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावर निश्चितपणे मात करून दारिद्र्य दूर करता येईल, असेही गीते यांनी सांगितले.