सरकारी भात खरेदीचे पैसे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:54 AM2021-03-11T00:54:41+5:302021-03-11T00:54:57+5:30

शेतकरी अडचणीत : कर्ज फेडायचे कसे अन् खायचे काय?

The government has run out of money to buy rice | सरकारी भात खरेदीचे पैसे रखडले

सरकारी भात खरेदीचे पैसे रखडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : कोरोनामुळे आधीच संकटात असताना आधारभूत भात खरेदी केंद्रावरून भात खरेदीची रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लॉकडाऊन असताना शेतीच्या कामात सूट दिली असतानाही हातात पैसे नसल्यामुळे शेतीची कामे कशी करायची, हा प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे. तसेच मार्चअखेरीस शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्ज भरावे लागते, ते कसे फेडायचे या विवंचनेत ते सापडले आहेत.

सहकारी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकरी भात विकून भरत असतो, पण शासनाच्या भात खरेदी केंद्रावर भात विकूनही दोन महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने आम्ही कर्ज भरायचे तरी कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी दरात वाढ करून १८५० व ५०० रुपयांचा बाेनस असा दर लागू झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत हाेते. या वर्षी झालेल्या नुकसानीनंतर भात खरेदी केंद्रांवर चांगला भाव मिळाल्याने हाती चांगले पैसे पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. भात पीक घेणे हे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत आहे. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांना भात पीक घेणे परवडत नाही. 

भात पिकाची लागवड करून हाती येणाऱ्या पिकातून खर्च वजा करून हाती काहीच उत्पन्न पडत नाही. व्यापारी भाताला क्विंटलला १२०० ते १५०० रुपयांचा भाव देतात. ही पिळवणूक थांबवण्यासाठी वसईतील शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.

महामंडळाला कागदपत्रे सादर
जानेवारीपासून भात खरेदी सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांनी या केंद्रात विकलेल्या भाताचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमाच झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत. मंडळाकडे निधी मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार असल्याचे अधिकारी कल्पेश चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.


 

Web Title: The government has run out of money to buy rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.