राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज वसईत, श्रीमद भागवत कथा सत्संग महोत्सवात होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 08:07 AM2020-01-15T08:07:42+5:302020-01-15T08:12:40+5:30
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज (15 जानेवारी ) संध्याकाळी 5 वाजता वसईत येत असल्याची माहिती सत्संग महोत्सव समिती व माणिकपूर पोलिस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
आशिष राणे
वसई - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज (15 जानेवारी ) संध्याकाळी 5 वाजता वसईत येत असल्याची माहिती सत्संग महोत्सव समिती व माणिकपूर पोलिस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त झाली आहे. वसईच्या सनसिटी परिसरातील कार्यरत उत्तरांचल मित्र मंडळाने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा सत्संग महोत्सवासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज वसईत येत आहेत.
या मंडळाचा हा सत्संग महोत्सव श्री बद्रीनाथ मंदिर, सनसिटी येथे 12 ते 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या ठिकाणी दररोज संध्याकाळी 4 वाजता श्रीमद् भागवत कथा आणि रात्री 8 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. इस्कॉनचे रघुवीर दास प्रभू हे या सत्संग महोत्सवाचे व्यासपीठासीन आहेत. अर्थातच उत्तराखंडचे निवासी व माजी मुख्यमंत्री राहिलेले राज्यपाल कोश्यारी हे खास आकर्षण असणार आहे आणि या महोत्सवातील भागवत कथेसाठी ते आज बुधवारी सायं. 5 वाजता स्वतः राज्यपाल कोश्यारी मुंबई ते वसई असा महामार्गावरून प्रवास करीत येणार असल्याने दक्षता म्हणून पोलिस, जिल्हा पप्रशासन सज्ज झाले आहे.
विशेष म्हणजे या कथा महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या भाविक खास करून उत्तराखंड संदर्भात नाळ जोडलेले भाविक या महोत्सवात मोठया संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुरक्षेसाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली.