गोविंदा अन् राज ठाकरेंमुळे झालेल्या पराभवाने अस्वस्थ, राज्यपाल राम नाईक यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:47 AM2018-03-04T02:47:44+5:302018-03-04T02:47:44+5:30
अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.
- शशी करपे
वसई : अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.
स्व. सुरेश जोशी स्मृती मंच आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या संयुक्त विद्यमाने राम नाईक यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना राम नाईक यांनी दिलखुलास उत्तरे दिली. रामभाऊंनी वडिलांचे संस्कार, संघाने लावलेली व्यायामाची आवड आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सवय यामुळे आरोग्य आणि अ़नेक अडचणींचा सामना आयुष्यात करता आल्याचे सांगितले.
जनसंपर्क, संघर्ष आणि सेवा ही आपल्या आयुष्याची त्रिसूत्री असून त्यामुळेच आपणाला आतापर्यंत भरभरून यश मिळत गेले. आपण कॅन्सरसारख्या विकारावर आत्मबल, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि जनतेच्या शुभेच्छा यामुळेच मात करून मृत्यूच्या दारातून परत आल्याची भावना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली.
कुष्ठरोग्यांना दिलेले अनुदान, अर्नाळा किल्ल्यातील मच्छिमारांना केलेला वीज पुरवठा, मनोरी गोराईला केलेला पाणी पुरवठा यांमुळे सर्वाधिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशात महाराष्ट्र दिसतो का? या प्रश्नावर त्यांनी कानपूर, अलाहाबाद, आग्रा, वाराणसी या शहरांमध्ये सोने गाळणारे कारागिर हे सांगली, साताºयातील आहेत. उत्तर प्रदेशाच्या राजभवनात महाराष्ट्र दिन साजरा करण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. शिवनेरी ते शिवजयंती असा मोटार सायकलने प्रवास करून आलेल्या मावळ््यांनी लखनऊ भगवेमय केले. त्यामुळे निश्चित उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसून आला, असे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात वीज, कायदा आणि सुव्यवस्था, उद्योगधंदे, व्यापार, नोकºया या समस्या आहेत. काम नसल्यामुळे लोक मुंबईतील झोपड्यांमध्ये दाटीवाटीने रहात आहेत. मात्र, त्यांच्या रोजगारासाठी उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. त्यात १ हजार ८५ गुंतवणूकदारांनी ४.२८ लाख कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ४० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मुलाखतीपूर्वी भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक यांनी रामभाऊंनी उत्तर प्रदेशचा उत्तम प्रदेश केला असे गौरवोद्गार काढले. जातीपातीच्या पलिकडे माणसाचा शोध घेणारे रामभाऊंचे व्यक्तीमत्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोमसापचे वसई शाखाध्यक्ष अनिल रोकडे यांनी स्वागत केले. हरेश्वर नाईक यांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार शेखर धुरी यांनी मानले. या दिलखुलास मुलाखतीमुळे अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.