सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धरले हाताशी; पालघर नगर परिषदेची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:43 PM2019-03-24T23:43:25+5:302019-03-24T23:43:33+5:30
मागील २० वर्षांपासून झालेल्या नगरपरिषद निवडणुका अगदी बारीक-सारीक कारणाने गाजत शांततेत पार पडल्या होत्या.
- हितेन नाईक
पालघर : सत्ताधाऱ्यांनी आचारसंहितेला न जुमानता प्रशासनाला हाताशी धरीत लावलेली ताकद आणि दुसरी कडे सत्तेच्या ताकदी पुढे हतबल झालेले विरोधक व अपक्ष अशीच काहीशी निवडणूक पालघर नगरपरिषदेची झाल्याचे निदर्शनास आले असून सोमवारी होणा-या मतमोजणी दरम्यान मतदार कुणाचे नेतृत्व स्विकारतो याचे उत्तर मिळणार आहे.
मागील २० वर्षांपासून झालेल्या नगरपरिषद निवडणुका अगदी बारीक-सारीक कारणाने गाजत शांततेत पार पडल्या होत्या. मात्र २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षातून आलेल्या डॉ. श्वेता पाटील-पिंपळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत अन्य बाहेरून आलेल्या पाच लोकांना सेनेची उमेदवारी दिल्याने उमेदवारी निश्चित झालेल्या सेनेतील १४ निष्ठावंतानी या निर्णया विरोधात बंड करून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
या अपक्ष उमेदवारांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क पाहता सेनेची सत्ता हातातून बाहेर जाऊ शकते हे सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे , भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि आ. रवींद्र फाटक यांना निदर्शनास येऊ लागले. सेना बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्या आपण यातून सकारात्मक तोडगा काढू हे आदेश अपक्षांनी नाकारल्याने निवडणुकीची सूत्रे सत्ताधाऱ्यांनी हाती घेतली. नगरपरिषद निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना निवडून आणा, मग पालघरमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य शासना कडून भरभरून निधी आणू हे आश्वासन देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना पालघर मध्ये आणण्यात आले. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मते मागण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांना पाचारण करावे लागले या वरुन पालघर नगरपरिषदेची निवडणूक किती ‘इज्जत का सवाल’ बनली याचा अंदाज मतदारांना आला होता.
अपक्ष बंडखोरां कडे मतदारांचा असणारा कल पाहता नगराध्यक्ष उमेदवारासह युतीच्या अनेक उमेदवारांना फटका बसू शकतो याची कल्पना आल्यानंतर प्रलोभने, पैसे वाटपाचा कार्यक्र म शनिवारच्या रात्रीत सुरू झाला. पालघर-माहीम रस्त्यावरील एका बिल्डिंग मध्ये प्रभाग क्र मांक १० ब मधील शिवसेनेचा उमेदवार अक्षय संखे हा काही लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मतदारांना प्रलोभने दाखवीत असल्याची शंका व्यक्त करीत त्यांना तात्काळ बाहेर काढण्याची मागणी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष केदार काळे आणि उमेदवार सचिन पाटील यांनी केली.
याच वेळी त्या बिल्डिंग मधून सेनेचा उमेदवार संखे हा बाहेर जात असल्याचे दिसून आल्यावर त्याला आणि त्याची बाजूला रस्त्यात उभी असलेली मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी करूनही पोलीस कारवाई करीत नसल्याने काँग्रेसच्या केदार काळे यांनी रस्त्यावर ठाण मांडून कारवाई ची मागणी केली. यावेळी घटनास्थळी आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सदर इमारतीची तपासणी केली. यावेळी अनेक फ्लॅट बंद अवस्थेत आढळले.
शनिवारी रात्री शहरात मोठ्या प्रमाणात एमएच १२, एमएच १५, एमएच ०२ आदि नंबरच्या गाड्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या टाळ्या फिरून मतदारांना धमकावत असल्याच्या तक्र ारी नंतर पोलीस अधिकारी नाईक यांनी गोठणपूर, खाणपाडा, पिलेना नगर, मीठ कंपनी आदी ठिकाणी गस्त घातली, यावेळी आनंदआश्रम शाळे जवळ बाहेरून आलेल्या १० ते १५ जणांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना पळवून लावले.
टेम्भोडे रोडवर फिरत असलेल्या जिल्या बाहेरील एका कारचा पाठलाग करून त्याची तपासणी केली असता त्यात लाकडी दांडूके आढळून आल्यावर पोलिसांनी चोप देत त्यांना पिटाळून लावले.
आचारसंहितेला दिली तिलांजली
शनिवारी जाहीर प्रचार संध्याकाळी बंद झाल्यानंतर आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधीना मतदान क्षेत्रा बाहेर काढणे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांचे काम आहे. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जात या लोकप्रतिनिधींनी १० दिवसांपासून पालघरमध्येच ठाण मांडले होते.
शनिवारी रात्री एक सत्ताधारी आमदार विजया बँकेच्या वर असलेल्या एका इमारतीमध्ये उमेदवाराला सोबत घेऊन मतदारांना प्रलोभने दाखवीत असल्याने आम्ही त्यांना रोखण्यासाठी जात असताना पोलिसांनी आम्हाला रोखले. रविवारी मतदानाच्या दिवशी भाजपाचे राज्यमंत्री मतदान क्षेत्रात बिनधास्त फिरत असताना त्यांना रोखण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नसल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केला आहे.