वसई-विरार शहरांतील गोविंदांची विम्याकडे पाठ?, गतवर्षीपेक्षा नोंदणी कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:23 PM2019-08-21T23:23:01+5:302019-08-21T23:23:17+5:30
गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.
- आशिष राणे
वसई : दहीहंडी आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. हा दहीहंडी उत्सव आणि त्यातील जोखीम तसेच जीवाचा धोका विचारात घेऊन त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी वसई - विरार महापालिकेने गोविंदांना मोफत विमा देण्याचे यंदा ठरवले आहे. परंतु पालिकेने याबाबत आवाहन केल्यानंतर बुधवार २१ आॅगस्टपर्यंत एकूण ३२ गोविंदा पथकांनी आपली नोंदणी केली आहे. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा थोडा कमी आहे. दरम्यान, शेवटच्या तारखेनंतरही आपण नोंदणी करून घेतो. त्यामुळे यंदाही ही संख्या नक्कीच वाढेल, अशी माहिती पालिकेच्या क्रीडा विभागाचे दिगंबर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. उंचावरील मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागते. ही चढाओढ आणि हा थरार शनिवारी वसई-विरारमध्ये अनुभवता येणार आहे.
उंचावरील हंड्या फोडताना गोविंदांना होणारे अपघात पाहता यंदाही गोविंदा पथकांसाठी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने खास विमा योजनेस मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेने वसई-विरारमधील गोविंदा पथकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.
या योजनेचे स्वरूप काय आहे
वसई-विरार महापालिकेतर्फे शहरातील नोंदणीकृत गोविंदा पथकांचा विमा नोंद केला जात आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख, तर दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रु पये, तसेच एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५ लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख या विम्यातून देण्यात येणार आहेत.
अपघातामुळे होणारा रुग्णालयाचा एक लाखांपर्यंतचा खर्च संबंधित विमा कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नोंदणीकृत ४ हजार ८१९ गोविंदांनी विम्याची नोंद केली होती.
परंतु यावर्षी २१आॅगस्टपर्यंत फक्त ३ हजार २०० गोविंदांच्या विम्याची नोंद झाल्याने ही आकडेवारी सध्या तरी अत्यल्प प्रतिसाद दर्शविते. त्यामुळे त्वरा करा शहरातील गोविंदांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा पालिकेच्या वतीने केले आहे.
हा आकडा अत्यल्प वगैरे नाही अद्यापही दोन दिवस आहेत, अगदी सण उद्यावर आला आहे, तरी पालिका नोंदणी घेते. प्रत्यक्षात जे प्रोफेशनल गोविंदा आहेत ते गुरूपौर्णिमेपासून सराव सुरू करतात. अशा शेकड्यांनी नोंदणी आपल्याकडे वेळीच येतात. मात्र ज्यांना माहीत अथवा कल्पना नसते ते अखेरीस येतात.
- दिगंबर पाटील, क्र ीडा विभाग, पालिका मुख्यालय, विरार