जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:13 PM2020-02-18T23:13:05+5:302020-02-18T23:13:25+5:30
भाजप-माकप उमेदवारांचे अर्ज मागे : शिवसेनेच्या भारती कामडी अध्यक्ष, तर निलेश सांबरे उपाध्यक्ष
हितेन नाईक
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या भारती कामडी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश सांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी तीन-तीन असे एकूण सहा अर्ज दाखल केले होते. दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटेपर्यंत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत प्रथम भाजप उमेदवारांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी भरलेले आपले अर्ज मागे घेतले. परंतु माकप-बविआकडून उमेदवारी अर्ज मागे घेतले जात नसल्याने निवडणूक होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु राष्ट्रवादीकडून वरिष्ठ पातळीवरून चर्चा केल्यानंतर त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक प्रक्रि या बिनविरोध पार पडली आणि निवडकणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले.
पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, काँग्रेस १ तर अपक्ष ३ असे राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा २९ हा आकडा सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व जिजाऊ सामाजिक संस्था पुरस्कृत २ अपक्ष असे मिळून ३५ सदस्य महाविकास आघाडीकडे असल्याने निवडणूक प्रक्रि या ही औपचारिक ठरणारी होती.
पालघरच्या जिल्हा परिषद संकुल सभागृहात मंगळवारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चालू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सकाळी ११ वाजता अध्यक्षपदासाठी सेना-राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि जिजाऊ शैक्षणिक संस्था या महाविकास आघाडीतर्फे भारती कामडी यांनी तर माकपच्या मनीषा बुधकर यांनी व भाजपतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी आपले अर्ज दाखल केले होते. तर उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे निलेश सांबरे यांनी तर बहुजन विकास आघाडीतर्फेविष्णू कडव यांनी आणि भाजपतर्फे रमेश डोंगरकर अशा एकूण तीन जणांनी आपले अर्ज दाखल केले होते.
अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून विक्रमगड तालुक्यातील तलवाडा गटातून निवडून आलेल्या भारती कामडी, दांडी गटातल्या वैदेही वाढाण तर गंजाड गटातल्या अमिता घोडा यांच्यात चुरस होती.
अमित घोडा यांना दिलेल्या शब्दाचे काय?
च्एकनाथ शिंदे, आ. रवींद्र फाटक यांनी सतत तीन वेळा जि.प.वर निवडून आलेल्या भारती कामडी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकल्याने उर्वरित दोन्ही उमेदवारांची नावे मागे पडली. दुसरीकडे वैदेही वाढाणला सेनेतल्या एका मातब्बर गटाच्या नाराजीचा मोठा फटका बसल्याने ऐनवेळी माशी शिंकली.
च्त्याच वेळी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या नावाखाली माजी आमदार अमित घोडा यांच्या
निवडून आलेल्या पत्नी अमिता घोडा यांना अध्यक्षपदासाठी दिलेल्या शब्दाचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने पालघर जिल्ह्याच्या विकासाला आता चालना मिळेल.
- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री