जि.प. शाळेला मिळाली आंतरराष्ट्रीय ख्याती; शिक्षक-प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी मिळवून दिले शाळेला नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:00 AM2020-02-03T01:00:35+5:302020-02-03T01:01:05+5:30
आदिवासी भागातील प्राथमिक गोवणे शाळा
- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक गोवणे शाळा वसली आहे. शाळेतील शिक्षक आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद केल्याने ही शाळा प्रख्यात झाली आहे. दरम्यान राज्याच्या शिक्षणाच्या वारीत शाळेचा हॅपी स्कुल प्रोजेक्ट लक्षवेधी ठरला आहे.
शाळेने विविध उपक्रम आणि कार्यक्रम सुनियोजितपणे राबवले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह अष्टपैलू बनविण्यासाठी मदत झाली आहे. राज्याच्या शिक्षणाच्या वारीमध्ये अतिशय प्रभावी ठरलेल्या या प्रोजेक्ट अंतर्गत सुमारे पंधरा लाखांचा निधी जमवून संपूर्ण शाळेचे रंगकाम, बोलक्या भिंती, सुरक्षा ग्रील, हॅण्ड वॉश स्टेशन, प्रशस्त असे प्रवेशद्वार, मैदानात टाइल्स, प्लेग्राउंड किट, प्रशस्त टॉयलेट अशा प्रकारच्या सुविधा वैयक्तिक वेळ देऊन, नियोजन करून व प्रत्यक्ष उपस्थित राहून निर्माण करून घेतल्या. त्यामुळे पूर्वीची निरस वाटणारी शाळा आता हॅप्पी स्कूल झाली आहे. विद्यार्थी आनंदाने शाळेत येऊ लागले आहे.
शाळेने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर लंगडी, खो-खो, तिरंदाजी, गलोल स्पर्धेत पदकं पटकावली आहेत. त्यात नेमबाजीवर विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा सराव शिक्षक विजय पावबाके यांनी घेतला. लाखो रुपयांचे सराव साहित्य उपलब्ध करून दिले असून राष्ट्रीय गलोल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मेहनत सार्थकी लावत तीन पदके पटकावली आहेत.
विश्वविक्रमी शाळा
विद्यार्थ्यांमधील गुणांच्या आविष्कारांसाठी व्यासपीठाची गरज असते. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नियमावली जाणून घेऊन विद्यार्थ्यांची कौशल्य ओळखून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करण्यात आले. म्हणूनच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची हॅट्ट्रिक करणारी देशातली पहिली जि.प. शाळा होण्याचा बहुमान या शाळेला मिळाला आहे. कु. संजना मंडळला युनेस्कोच्या चित्रकलेतील राष्ट्रीय पुरस्कार, तर दीपेश या विद्यार्थ्याने ‘फास्टेस्ट अल्फाबेट्स अरेंजमेंट’चा विश्वविक्रम केला आहे.
युनेस्कोचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भटनागर यांच्या मार्गदर्शनाने या शाळेत युनेस्को स्कूल क्लबची स्थापना करणारी ही देशातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे.
-विजय पावबाके, शिक्षक
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले असून परदेशात जाण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
-संजना मंडळ, विद्यार्थिनी
शाळेची वैशिष्ट्ये : प्रशस्त इमारत, क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरण मिळालेले पुरस्कार, सन्मान : आदर्श शाळा, स्वच्छ सुंदर शाळा.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ३५ लक्ष
विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन, क्रीडा साहित्य मिळावे यासाठी सोशल मीडियाद्वारे शाळेतील शिक्षकांनी शाळेसाठी ३५ लाखाहून अधिकनिधी उपलब्ध करून दिला.