ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा १३ ला मोर्चा
By admin | Published: July 8, 2016 03:35 AM2016-07-08T03:35:27+5:302016-07-08T03:35:27+5:30
पालघर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बुधवार दि. १३ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात
बोईसर : पालघर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बुधवार दि. १३ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार असून त्याच दिवसापासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिला आहे.
म. रा. कर्म. संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार जिल्हापरिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या सभा घेत नसल्याने शासन, पंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पालघर जिल्हयातील ५० टक्के पेक्षाही जास्त ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांना किमान वेतन ही दिले जात नाही.
जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या शर्तीवर व जितकी त्रैमासिक रजा दिलेली आहे तेवढी रजा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली असतांनाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना रजा मिळत नाही. जर त्यांनी रजा घेतली तर त्यांचा पगार कपात केला जातो. हे अतिशय अन्यायकारक आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून होणारी दहा टक्के भरतीची यादी तयार करतांनाही अनियमितता आहेत तर अनेक ग्रामपंचातीमध्ये कर्मचारी वर्गाचे सेवा पुस्तक भरून ते अद्ययावत केलेले नसून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेचाही भरणा केलेला नाही. जर या धडक मोर्चापूर्वी समाधानकारक तोडगा निघाला नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याने पाणी पुरवठा, साफसफाई, स्वच्छता, दिवाबत्ती तसेच देखभाल दुरूस्ती इत्यादी कामांवर विपरीत परिणाम होणार आहे.
याबाबत प्रशासनाची प्रतिक्रिया कोणती आहे हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. (वार्ताहर)
जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा व तालूका स्तरावर बैठका घेत नसल्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या समस्या कोणाकडे मांडायच्या व त्यांची अंमलबजावणी कोणी करायची? एकंदरीत आमच्या कर्मचाऱ्यांची समस्यांची दखल संबंधीत विभागाने घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या गंभीर प्रश्नासंदर्भात उदासीन धोरण असल्याने नाईलाजास्तव जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहून १३ जूलै रोजी धडक मोर्चा काढणार असून बेमूदत काम बंद आदोलनही सुरू करण्यात येणार आहे.
- संतोष पां. मराठे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना.