अवैध रेती उत्खननाची ग्रामपंचायतीविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:25 AM2018-07-03T03:25:03+5:302018-07-03T03:25:12+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली.
बोर्डी : जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली. या कक्षाने तत्काळ दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी करून नागरिकांना लेखी किंवा तोंडी तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर चोवीस तासातच पहिली तक्र ार घोलवड गावातून दत्ता इंदुलकर यांनी नोंदविली. या तक्र ारीची दखल कक्षाने घेऊन सोमवारी म्हणजे २ जुलै रोजी डहाणू तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर तलाठी अनिल वायाळ यांनी पंचनामा केला. त्या मध्ये घोलवड ग्रामपंचायतीने शासकीय दवाखाना ते दत्त मंदिरापर्यंत पाण्याचा निचरा व्हावा याकरीता गटार बांधण्यासाठी लगतच्या समुद्रकिनाºयावरून एक ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केल्याचे उघड झाले. शिवाय घटनास्थळी शासनाचा महसूल बुडवून उत्खनन केलेले १२ ब्रास रेतीही आढळल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत विरुद्ध कोणते पाऊल उचलले जाते या कडे लक्ष लागले आहे. शिवाय विविध ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांच्या नावाखाली अवैध रेतीचे सर्रास उत्खनन केले जाते. त्या मध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासनाचे अधिकारी यांचे संगनमत असते.
दरम्यान डहाणू किनाºयावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या मात्र दखल घेतली जात नव्हती. आजच्या कारवाईने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रेती चोरी विरुद्ध लोकमतने बातम्यांची शृंखला चालवून महसूल व पोलीस प्रशासनाला जागे केले होते. त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाला हा कक्ष स्थापन करावा लागल्याचे बोलले जात आहे. आता या कक्षाकडे किती तक्रारी येतात व त्यांची कशी दखल घेतली जाते. कारवाई केव्हा व कशी होते याकडे लक्ष लागले आहे.
नियंत्रण कक्षाकडून प्राप्त तक्र ारीची दखल घेत, तत्काळ तलाठ्यांना पाठवून पंचनामा करण्यात आला आहे.
- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू
तक्रारीची तत्काळ दखल घेतल्याने समाधानाची भावना आहे. लवकर कारवाई झाल्यास योजनेचा उद्देश सफल होईल.
- दत्ता इंदुलकर,
तक्र ारदार