काेराेना रुग्णांचा आलेख घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 12:22 AM2021-05-08T00:22:19+5:302021-05-08T00:23:02+5:30
पालघर ग्रामीणमधील स्थिती : वेळीच काेराेना चाचणी झाल्याने याेग्य उपचार
राहुल वाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव पसरत हाेता. त्यावर आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययाेजना करून ग्रामीण भागात अँटिजन चाचणी आराखडा तयार केला. आराखड्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण दुर्गम भागातील जोडलेल्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत अँटिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या कमी होत चालल्याचा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील बाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या चाचणी आराखड्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकले.
जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षेतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ग्रामीण भागातील नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. त्यामुळे रुग्ण गंभीर हाेण्याआधीच त्यांना उपचार मिळत आहेत. ज्या नागरिकांना लक्षणे नाहीत, मात्र त्यांना लागण झाली आहे अशांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांंच्यावर औषधाेपचार करण्यात येत आहेत. तर लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरण केंद्रांत पाठवले जात आहे. या नियोजनामुळे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या खाटांची उपलब्धता वाढत आहे. तसेच, प्राणवायूचे योग्य नियोजन होत असून मृत्युदर नियंत्रणात आला आहे, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात १२ एप्रिल ते १८ एप्रिल या दुसऱ्या आठवड्यात ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बाधित होते. प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे हीच रुग्णसंख्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात व मेच्या पहिल्या आठवड्यात कमी होत गेली. २६ एप्रिल ते ५ मे यादरम्यान केलेल्या सर्वेक्षणात अँटिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे तीन आठवड्यांत रुग्णसंख्या सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. याच बरोबरीने मृत्युदरही १.६८ टक्क्यांवरून ०.७३ टक्क्यांवर आला आहे.
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाला विलंब होत असल्याने अँटिजन चाचण्यांवर भर देऊन त्याद्वारे रुग्ण शोधमोहीम राबवली गेल्याने रुग्णवाढीचा आलेख खालावत गेला.
आराेग्य केंद्रे, रुग्णालयांत चाचणीवर भर
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यकक्षेंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २५ हजार १९० अँटिजन चाचण्या १६ एप्रिल ते ४ मे दरम्यान करण्यात आल्या. यात पाच हजार ७९ काेराेनाबाधित रुग्ण आढळले.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत असलेल्या ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालय यामध्ये याच कालावधीत नऊ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या. यात २३१९ रुग्ण आढळले. तर काही खासगी रुग्णालयांमध्ये ५६८ चाचण्यातून २०९ रुग्ण सापडले.
माेठा निधी केला खर्च
जिल्हा प्रशासनाने यासाठी मोठा निधी खर्च करून अँटिजन चाचणी संच मोठ्या प्रमाणात खरेदी केले. चाचणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर बाधित रुग्णांवर ताबडतोब उपचारासाठी पुरेसा औषधसाठ्यासाठी जिल्ह्याने मोठा निधी खर्च केला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
अँटिजन चाचणीचा अहवाल विनाविलंब मिळत असल्याने रुग्णांना वेळीच उपचार शक्य झाले. त्यामुळे रुग्णसंख्या घटत आहे आणि यापुढेही घटेल, असा विश्वास आहे.
- डॉ. माणिक गुरसळ,
जिल्हाधिकारी