श्रावणामध्ये रानभाज्यांना वाढती मागणी, आरोग्यासाठी पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:59 PM2019-08-19T23:59:21+5:302019-08-19T23:59:36+5:30
कुपोषण मुक्तीमध्ये या भाज्यांमधील घटक द्रव्यांचा आवर्जून विचार करायला हवा, हा आग्रहही वाढता आहे. श्रावणामध्ये मांसाहार वर्ज्य असल्याने गावठी रानभाज्यांची मागणी वाढते.
विक्रमगड : पावसाळा सुरू झाला की विक्र मगड, जव्हार, मोखाडा, वाडा या भागात इतर भाज्यांसोबत रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले हटकून या भाज्या खातातच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जातात. कुपोषण मुक्तीमध्ये या भाज्यांमधील घटक द्रव्यांचा आवर्जून विचार करायला हवा, हा आग्रहही वाढता आहे. श्रावणामध्ये मांसाहार वर्ज्य असल्याने गावठी रानभाज्यांची मागणी वाढते.
पावसाळ्यात डोंगराळ भागामध्ये या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या शेतकरी महिला बाजारात त्या विक्र ीसाठी घेऊन येतात. यातील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे यातील काटेरी प्रकारातल्या काही भाज्या काढल्यावर त्या खड्यांचे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून त्यांचे विषारी-बिनविषारी गटात वर्गीकरण केले जाते.
कोणती काळजी घ्यायची?
रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे इच्छा असूनही अनेकांना त्या विकत घेता येत नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक विक्रेत्यांकडून घ्याव्यात. त्यांना या भाज्यांविषयी अचूक माहिती असते. ज्या भाज्यांमध्ये पानांचा समावेश अधिक आहे. या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकळून ते पाणी टाकून द्यावे, त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यांमधील अंगभूत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या असतात. त्यामुळे त्यात खतेही वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही. उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.
काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. कोंब आलेली भारंगी, शेवळं म्हणजे पांढºया मशरुम्सचाच एक महत्त्वाचा प्रकार. या भाज्यांमध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसात शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घ्यायला हवा.
पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. या भाज्याही उकडून शिजवल्या जातात. कण्टोला काटेरी फळ असणाºया भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात.