वाढवण बंदराच्या कामास सहा महिन्यांत प्रारंभ
By admin | Published: October 14, 2015 02:23 AM2015-10-14T02:23:19+5:302015-10-14T02:23:19+5:30
भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल
पालघर : भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल व त्याचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान आणि मी महाराष्ट्रात पुन्हा येऊ, त्याचा शानदार सोहळा होईल, असा गौप्यस्फोट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटीच्या विस्तार सोहळ्यात केल्यामुळे पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नेहरू सेंटरमध्ये अॅडव्हान्टेज महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद घेतली होती. तिच्यात झालेला सर्वात मोठा गुंतवणूक करार हा वाढवण बंदराचा होता. आॅस्ट्रेलियातील पी अॅन्ड ओ या कंपनीला हे बंदर साकारणे व चालविणे याचा ठेका दिला होता. त्याबाबतचे इरादा पत्र तिला तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते देण्यात आले होते. परंतु त्याला भूमीपुत्रांनी विरोध केला होता. जवळपास ४० हजार रहिवाशांनी आपल्या स्वाक्षऱ्यानिशी या बंदराला विरोध करणारे निवेदन शिवसेनाप्रमुखांना दिले होते. त्यानुसार त्यांनी सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते रद्द झालेही होते. परंतु २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा प्रकल्प साकार करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. (वार्ताहर)