पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत कोसळली, पुलाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:33 PM2017-09-24T23:33:51+5:302017-09-24T23:33:58+5:30
वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने थोडी खचली होती.
वाडा : वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने थोडी खचली होती. मात्र त्याकडे बांधकाम विभाग आणि भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याचा ठेका घेतलेल्या सुप्रीम कंपनीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही भिंत ह्या वर्षाच्या पावसामधे पूर्णपणे खचून नदीपात्रात आली आहे त्यामुळे पुलाचा भराव आणि नदीचा काठ मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे त्यामुळे ह्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यातच नवीन पूलगेल्या तीन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ह्याच जुन्या पुलावरुन अवजड आणि इतर वाहतूक सुरु आहे.
पिंजाळ नदी सह्याद्रीच्या डोंगर-दºयांमधे उगम पावते आणि ती वाहत असलेल्या भागात पावसाचे प्रमाण सुद्धा जास्त आहे त्यामुळे ह्या नदीच्या प्रवाहाचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे अशा संरक्षक भिंतीमुळे ह्या नदीवरील पूलांना मजबूती मिळते मात्र संरक्षक भिंती कोसळल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. जर मुसळधार पाऊस पडून नदीला मोठा पूर आल्यास सावित्री नदीवर झालेल्या अपघातासारखा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ह्या रस्त्याच्या ठेका घेतलेल्या सुप्रीम कंपनीने ह्या घटनेकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर नवीन संरक्षक भिंत बांधावी तसेच ह्या पूलाच्या बाजूला अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहनचालकांकडून तसेच प्रवाशांकडून होत आहे.