कुपोषणाच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री उदासीन
By admin | Published: November 7, 2015 12:14 AM2015-11-07T00:14:06+5:302015-11-07T00:14:06+5:30
जव्हार-मोखाड्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण असून पालघर जिल्ह्णात ५ हजार १६२ पेक्षा अधिक आदिवासी बालके तीव्र कुपोषित आहेत. अशी धक्कादायक आकडेवारी असताना कुपोषीत
पालघर : जव्हार-मोखाड्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण असून पालघर जिल्ह्णात ५ हजार १६२ पेक्षा अधिक आदिवासी बालके तीव्र कुपोषित आहेत. अशी धक्कादायक आकडेवारी असताना कुपोषीत बालकासाठी सुरू असलेले ग्राम बालविकास केंद्र (वीसीडीसी) बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णु सवरा हे बघ्याची भुमीका घेत असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहासमोर ठिय्या आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. पालघर पोलीसांनी आंदोलनक र्त्यांना ताब्यात घेतले आहे.
जव्हार-मोखाड्यातील भागाला शाप ठरलेला कुपोषणाचा प्रश्न अनेक वर्षापासून जैसे थे परिस्थितीत पडून असून कुपोषणाच्या निर्मूलनासाठी आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाने हजारो कोटी रू. चा खर्च केला आहे. मात्र योग्य नियोजन व शासन स्तरावरील उदासीनता यामुळे कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नाचे उच्चाटन करण्यात आजपर्यंत यश आलेले नाही. पालघर जिल्ह्णात आजही ५ हजार १६२ पेक्षा अधिक आदिवासी बालके तीव्र कुपोषीत आहेत. ही धक्कादायक आकडेवारी असताना जिल्ह्णात कुठेच कुपोषण नाही असा अजब शोध पालघर जिल्हापरिषदेमधील एका लोकप्रतिनिधीने लावून तसे एका कार्यक्रमात जाहीर केल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद उमटले होते. त्यावरून लोकप्रतिनिधींना कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नाचे किती गांभीर्य आहे हे दिसून आले आहे.
कुपोषणासारख्या गंभीर प्रकाराचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने ग्रामबालविकास केंद्र उभारण्यात आली होती. ही केंद्रे निधीअभावी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेऊन तसेच पत्रही आरोग्य विभागाने काढले आहे. त्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून पालघर-ठाणे जिल्ह्णातील हजारो आदिवासी श्रमजीवी बांधव ९ नोव्हेंबर रोजी वाडा येथील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार आहे, असा इशारा बाळाराम भोईर यांनी सांगितले. (वार्ताहर)