सोशल मीडियाद्वारे कृषीशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:30 AM2020-04-27T02:30:46+5:302020-04-27T02:30:50+5:30
योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शेत पिकाचे संरक्षण आणि उत्पादन विक्रीच्या मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांना बेजार केले. दरम्यान, कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने सोशल मीडियाचा खुबीने वापर केल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या मार्गदर्शन मिळते आहे. लॉकडाऊनमुळे शेतकºयांपुढील अडचणी वाढल्या आहेत. शेतपिकांचे कीड - रोगापासून संरक्षण तसेच संवर्धन, तसेच योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. या संचारबंदीच्या काळात शेतकºयांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर अधिक भर दिल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी दिली. त्यानुसार शेतकºयांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून शेतीची कामे करताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा उपयोग याविषयी आकाशवाणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यामुळे पिकांची तोडणी, वर्गवारी आणि निर्यात करताना योग्य खबरदारी घेतल्याची माहिती शेतकºयांनी दिली.
पीक संरक्षणतज्ज्ञामार्फत जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या चिकू, आंबा आणि अन्य भाजीपाला पिकावर कधी कीटकनाशकाची फवारणी करावी याची माहिती दिली जाते. जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी आणि डहाणू येथील शेतकºयांना बांधावर मार्गदर्शन देण्याची जबाबदारी कृषीतज्ज्ञ चोख बजावत आहेत.
यासाठी त्यांच्याकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. जिल्ह्यातील विविध शेतकºयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शास्त्रज्ञांना जोडले आहे, वेळप्रसंगी नवीन ग्रुपची निर्मिती झाली आहे. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी व्हिडिओ कॉलिंगचा पर्यायही स्वीकारला जातो.
>संचारबंदी असल्याने शेतमाल निर्यातीचे परवाने, शहरातील बाजारपेठांचे नियोजन समजावून घेणे शक्य झाले. त्यामुळेच काही उत्पादक या काळात स्वत: निर्यातदार आणि विक्रेताही बनले. या केंद्राच्या गृहविज्ञानतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिला शेतकरी गटातील सदस्यांना मास्कनिर्मितीचे तंत्र शिकवून आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. हे करताना मालाची आॅर्डर घेण्याचे कामही केंद्रामार्फत केले जाते.