विद्यार्थ्यांना दिले लैंगिक शिक्षणाचे मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 01:17 AM2019-09-04T01:17:57+5:302019-09-04T01:18:38+5:30
संगीता दारव्हेकर ट्रस्टचा सीमा भागात उपक्र म : व्यक्तिमत्व विकासाचाही समावेश
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : सीमा भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देतानाच आदिवासी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देऊन जागरूक करण्यासह शोषणाविरुद्ध सजग करण्याचे कार्य संगीता दारव्हेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हाती घेतले आहे. बोर्डीचे सुपेह विद्यालय आणि बोरीगावच्या व.का. लाखाणी हायस्कूल येथे यासंबंधी नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थी प्रतिभावंत आहेत. मात्र स्वत:ला व्यक्त करण्यात ते कमी पडत असल्याने मोठ्या संधीपासून मागे राहतात. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच यश मिळविण्यात होणाऱ्या सकारात्मक बदलाची माहिती व्यक्तिमत्त्व विकासाच्या व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली. सेक्स या शब्दाने विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर येणारे दडपण आणि अव्यक्त झाल्यामुळे होणारा भावनिक कोंडमारा या विषयीचे मार्गदर्शन ‘वयात येताना’ व्याख्यानातून करण्यात आले. यावेळी पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलाविषयी माहिती दिली. दरम्यान, या उत्सुकतेपोटी चुकीची आणि अर्धसत्य माहिती मिळाल्याने होणारे गैरसमज याबद्दल सजगता निर्माण करताना विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळे सेशन घेण्यात आले तर लैंगिक शोषणाविरुद्ध सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पोस्को कायद्यातील तरतुदी, अधिकार तसेच शिक्षा याबद्दल समजाविण्यात आले.
या तज्ज्ञांनी दिली माहिती
आत्मविश्वास आणि यश याविषयी व्याख्याते श्याम वारीयर यांनी तर विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षणाविषयी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अरुणा सदरंगानी, डॉ. स्मिता मूर्ती आणि विद्यार्थ्यांना हितेन वाडिवाला, राजेश सदरंगानी, डॉ.सुहास दारव्हेकर यांनी मार्गदर्शन करून, त्यांच्या शंकांचे निरसन केले.
‘सेक्स या विषयाबद्दलच्या जिज्ञासेने चुकीची माहिती मिळाल्याने काही विद्यार्थी याला बळी पडतात. तर ८ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींना गर्भधारणा झाल्याची अनेक उदाहरणे आदिवासी भागात घडतात. त्यामुळे शाळा सोडावी लागते. हे घडू नये हे या उपक्र माचे प्रयोजन आहे.’
- डॉ. सुहास दारव्हेकर (संस्थापक, संगीता दारव्हेकर चॅरिटेबल ट्रस्ट)