गटारांची झाकणे बनली जीवघेणी; डहाणू नगर परिषदेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:19 PM2019-06-03T23:19:46+5:302019-06-03T23:19:52+5:30
पर्यटक वावरतात जीव मुठीत घेऊन
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गालगत पारनाका या पर्यटनस्थळानजीक गटारांच्या चेंबरची १० ते १२ झाकणं फुटल्याने पर्यटकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते आहे. याबाबत स्मारणपत्र देऊनही नगर परिषद लक्ष घालीत नसल्याचा आरोप नगरसेविका श्वेता संजय पाटील यांनी केला आहे.
या नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत पारनाका येथील के. एल. पोंदा हायस्कूल परिसरात ही १० ते १२ झाकणे फुटली असल्याचा प्रकार नगरसेविका श्वेता पाटील यांनी स्मरण पत्राद्वारे समोर आणला. मात्र या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. हा पर्यटनाचा हंगाम असून येथील पारनाका चौपाटी या काळात पहाटेच्या जॉगिंगपासून ते मध्यरात्रीपर्यंत गजबजलेली असते.
हा प्रमुख राज्य मार्ग असल्याने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनांची वर्दळ असते. शिवाय कोर्ट, पंचायत समिती, उप वन संरक्षक कार्यालय आणि पुढे उप जिल्हा रुग्णालय असल्याने हा भाग गर्दीचा आहे. त्यामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. शिवाय १५ जूनपासून शाळा-महाविद्यालयाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होत असल्याने नर्सरीपासून ते एचएससीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतील. दरम्यान मान्सून दाखल होण्यापूर्वी झाकणं बसविणे आवश्यक असून तसं न झाल्यास पादचाऱ्यांना नाहक जीवाला मुकावे लागू शकते. त्यामुळे तातडीने कार्यवाही अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पारनाका समुद्रकिनारी फेरीबोट उलटून तीन विद्यार्थिनींना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे हा परिसर ओळखला जातोय. पुन्हा येथे झाकणं विरहित चेंबर मध्ये पडून जीवितहानी झाल्यास या पर्यटनस्थळाला कु प्रसिध्दी लाभू शकते. ते टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.
सदर समस्येबाबत नगरपरिषदेला स्मरणपत्र द्यावे लागणे हा दुर्दैवी प्रकार आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कार्यवाही अपेक्षति आहे.
- श्वेता पाटील (नगरसेविका, डहाणू नगर परिषद)