तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 12:08 AM2021-02-01T00:08:55+5:302021-02-01T00:10:35+5:30

वसई तालुक्यातील निसर्ग संपदेने नटलेले तुंगारेश्वर अभयारण्य आता भकास होण्याच्या मार्गावर असून प्राण्यांची होणारी शिकार व अभयारण्यात वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.

Habitat of animals in Tungareshwar Sanctuary endangered | तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात

तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात

googlenewsNext

पारोळ : वसई तालुक्यातील निसर्ग संपदेने नटलेले तुंगारेश्वर अभयारण्य आता भकास होण्याच्या मार्गावर असून प्राण्यांची होणारी शिकार व अभयारण्यात वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.

तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले; मात्र आता जंगलात शिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून पशू-पक्ष्यांच्या शिकारीसह दुर्मीळ सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. जंगलात वारंवार आगी लावण्यात येत आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यांत भूमाफियांनी अतिक्रमण करून जंगल गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका अभयारण्यातील पशू-पक्षी आणि त्यांच्या अधिवासाला बसतो आहे. दरम्यान, अपुरी साधनसामग्री आणि तोकडे मनुष्यबळ यामुळे तुंगारेश्वर अभयारण्याकडे लक्ष देण्यात अपयश येत असल्याचे वन विभागाचेच म्हणणे आहे.

तुंगारेश्वर अभयारण्यात पूर्वी मोठ्या संख्येने वन्य प्राणी व पक्षी अधिवास करत होते. मात्र आता याकडे प्रशासन आणि वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने जंगलपट्टा नष्ट होऊन वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.  एकीकडे वाढते नागरीकरण व त्यातून उद्भवणारे अतिक्रमण यामुळे वन खात्याला आवश्यक असणारे वाढीव मनुष्यबळ न मिळाल्याने हा अनर्थ घडतो आहे. 

विविध झाडे, पशू व पक्ष्यांनी समृद्ध असलेल्या या अभयारण्यात मुरुड शेख, हरडा, सागवन, सावर, पळस, शिसव, बांबू, चिंच, खैर, अर्जुन, जांभूळ, बकुळी, राजन, काकड, मोह अशा विविध प्रकारच्या वनस्पती तसेच बिबट्या, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्यप्राणी तर पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकिळा, पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, शामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी असे २५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि शिकार यामुळे वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.

अभयारण्यामधील बेकायदा बांधकामे व होणारी शिकार का प्रकारावर कारवाईची गरज आहे. जर वेळीच या प्रकाराला आळा बसला नाहीत तर येथील निसर्गसंपदा व वन्यजीव यांच्यासाठी धोक्याच आहे.
- लक्ष्मीप्रसाद पाटील,महाराष्ट्र सचिव, पर्यावरण मित्र बहूद्देशीय संस्था

Web Title: Habitat of animals in Tungareshwar Sanctuary endangered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.