मोकाट कुत्र्यांचा हैदोस
By admin | Published: October 10, 2016 02:51 AM2016-10-10T02:51:39+5:302016-10-10T02:51:39+5:30
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी सध्या सुमारे शंभर-दीडशे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातील काही कुत्री पिसाळलेली असल्याने
वसई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी सध्या सुमारे शंभर-दीडशे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातील काही कुत्री पिसाळलेली असल्याने पर्यटकांच्या अंगावर धावून जात असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी सध्या पर्यटकांची गर्दी असते. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या मार्गावरच असलेल्या डम्पिंंग ग्राउंडमुळे किनारा अस्वच्छ झाला आहे. प्रचंड दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे गावकऱ्यांसह पर्यटकही त्रस्त झाले आहेत. ही घाण ओलांडून गेल्यानंतर समुद्रकिनाऱ्याची मौजमजा लुटणाऱ्या पर्यटकांना आता मोकाट कुत्र्यांपासून सावध राहावे लागत आहे.
सध्या किनाऱ्यावर शंभर-दीडशे मोकाट कुत्री फिरत आहेत. यातील काही पिसाळलेली आहेत. ही कुत्री पर्यटकांच्या अंगावर धावून जात असतात.
कुत्र्यांचा काहीच बंदोबस्त केला जात नसल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढताना दिसत आहे. समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टमध्ये उरलेल्या अन्नाचा कचरा समुद्रकिनारी आणून टाकला जातो. तसेच समुद्रकिनारी पहाटेपासून येथील लोक शौचास बसत असतात. कुत्र्यांना त्यामुळे खाण्याची आयतीच सोय होत असल्याने समुद्रकिनारी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढून त्यांचा वावर सुरू झाला आहे. पालिका हद्दीतील मोकाट कुत्री पकडून या ठिकाणी साडली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)