राजकीय पुनर्वसनासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:47 PM2019-09-05T22:47:43+5:302019-09-05T22:47:50+5:30

परिवहन समिती निवडणूक : भाजपकडून मत फोडण्याची व्यूहरचना

Hard for political rehabilitation | राजकीय पुनर्वसनासाठी खटाटोप

राजकीय पुनर्वसनासाठी खटाटोप

Next

मीरा रोड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सोय लावण्यासाठी परिवहन समितीवर १२ सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपने १०, शिवसेनेने ४ तर काँग्रेसने १ असे उमेदवार उभे केले असून मतदान गुप्त असल्याने काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांची मते फोडण्याची रणनीती आखण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. केवळ राजकीय सोय लावली जात असल्याने उमेदवारांचे अर्ज रद्द करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेची परिवहनसेवा डबघाईला आली असून प्रवाशांनी तर एमबीएमटीचे नामकरण चक्क ‘मेरे भरोसे मत ठहरो’ असे करून टाकले आहे. परिवहनसेवेची दुरवस्था असली, तरी समितीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने आपल्या राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी १२ सदस्यनिवडीसाठी निवडणूक होणार आहे. समितीच्या सदस्यपदांसाठी भाजपकडून माजी नगरसेवक शिवप्रकाश भुदेका, महिला आघाडी अध्यक्षा वनीता बने, भाजपचे पदाधिकारी देवीप्रसाद उपाध्याय, अविनाश जागुष्टे, उदय शेट्टी, मंगेश पाटील, दिलीप जैन, टॉमस ग्रेशियस, विश्वनाथ पाटील, रशीद अन्सारी अशा १० जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक राजेश म्हात्रे यांच्यासह लक्ष्मण कांदळगावकर, सचिन मांजरेकर व शिवशंकर तिवारी, तर काँग्रेसच्या वतीने राजकुमार मिश्रा यांनी अर्ज दाखल केले आहेत. परिवहन समिती सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करणारे जवळपास सर्वच उमेदवार हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी वा संबंधित आहेत. नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, सभापती दीपिका अरोरा, उपसभापती वंदना भावसार, नीला सोन्स आदी, तर शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर, सभापती तारा घरत, नगरसेविका भावना भोईर, स्नेहा पांडे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने गटनेते जुबेर इनामदार सोबत होते.
भाजपचे ६१, शिवसेनेचे २२ तर काँग्रेस व समर्थक अपक्ष मिळून १२ असे एकूण ९५ नगरसेवक आहेत. यातील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे ८, शिवसेनेचे ३ तर काँग्रेसचा १ सदस्य सहज निवडून येऊ शकतो. परंतु, भाजपने १० तर सेनेने ४ उमेदवार उभे केल्याने चुरस निर्माण झाली आहे.
सेनेच्या अनिता पाटील, तर काँग्रेसचे नरेश पाटील व समर्थक अपक्ष अमजद शेख या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय काँग्रेस आणि सेनेतील काही नगरसेवक भाजपने गळाला लावलेले आहेत, असे समजते.

पदाधिकाऱ्यांचे अर्ज फेटाळा
परिवहन समितीवर सदस्य म्हणून प्रशासन, परिवहनचा अनुभव तसेच अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्य, आर्थिक किंवा कामगारविषयक माहिती असेल, अशा व्यक्तींमधून सदस्य नेमणे आवश्यक आहे. परंतु, आलेले अर्ज हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच संबंधित आहेत. त्यामुळे त्यांनी सदस्यत्वासाठी जोडलेली कागदपत्रे बोगस वा खोटी असण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी करावी, अशी लेखी तक्रार माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केली आहे. अशांचे अर्ज फेटाळण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Hard for political rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.