हत्तीपाडा रस्ता गेला वाहून; निधी पाण्यात"
By admin | Published: July 3, 2017 06:05 AM2017-07-03T06:05:08+5:302017-07-03T06:05:08+5:30
वसई पूर्व भागातील थळयाचा पाडा वरून हत्तीपाडा येथे जाण्यासाठी यंदा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सहा लाख निधी खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई पूर्व भागातील थळयाचा पाडा वरून हत्तीपाडा येथे जाण्यासाठी यंदा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सहा लाख निधी खर्च करून तयार केलेला पक्का रस्ता पहिल्या पावसातच धुवून गेल्याने शासनाचे सहा लाख रुपये पाण्यात गेले आहेत.
हा रस्ता जंगलातून जात असल्याने माती रस्त्यावर येऊन चिखल होत असल्याने या पाड्यातील विद्यार्थी व रु ग्ण यांना मोठा फटका बसत होता. गावात प्रवाशी वाहन जावू न शकल्याने त्यांना पायीच प्रवास करावा लागत आहे. हत्तीपाडा येथे मोठा बंधारा असल्याने पर्याटकांची रेलचेल या ठिकाणी नेहमी असते. या ठिकाणी पर्याटनाला चालना व पाड्यातील नागरिकांची गैर सोय दूर करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात सहा लाख निधी खर्च करून पक्का रस्ता तयार केला. परंतु, पहिल्याच पावसातच डांबर वाहून गेल्याने आतील खडी व माती वर आली आहे.
वसई पूर्व भागात या वर्षी करण्यात आलेल्या आडणे, मेढा, अंबोडे या ठिकाणी केलेल्या रस्त्याच्याकामांचा दर्जा ही निकृष्ठ असल्याचे पहिल्या पावसातच समोर आले आहे. या रस्त्याचे काम करत असताना वापरण्यात येणाऱ्या डांबरात खराब इंजिन आॅइल चा वापर ठेकेदार करीत असल्याचा आरोप नागरीक करत असून नागरिकांची गैर सोय झाली तरी चालेल, शासनाचा निधी वाया गेला तरी चालेल पण ठेकेदार जगला पाहीजे या धर्तीवर जिल्हा परिषद अभियंते काम करीत असल्याचा सुर या भागात उमटत आहे.