हॉरबिंगरच्या कामगारांना मिळाली घसघशीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:55 PM2018-05-29T23:55:55+5:302018-05-29T23:55:55+5:30
तालुक्यातील मुसारणे येथील मे गाला प्रिसिजन टेक्नॉलॉजी (हॉरबिंगर) या कपंनीतील कामगारांसाठी गणेश नाईक यांच्या श्रमिक सेना युनियनने पगारवाढीचा करार केला
वाडा : तालुक्यातील मुसारणे येथील मे गाला प्रिसिजन टेक्नॉलॉजी (हॉरबिंगर) या कपंनीतील कामगारांसाठी गणेश नाईक यांच्या श्रमिक सेना युनियनने पगारवाढीचा करार केला असून त्याद्वारे १३ हजार रुपयांची भरघोस वेतनवाढ कामगारांना तीन वर्षांत मिळवून दिली आहे. श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव गणेश नाईक आणि सरचिटणीस चरण जाधव यांनी वेळोवेळी व्यवस्थापनाबरोबर बैठका घेऊन कामगारांच्या हिताचा हा करार केला आहे.
जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीसाठी हा करार राहणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये ७८०० रुपये, जानेवारी २०१९ मध्ये २६०० रुपये आणि जानेवारी २०२० मध्ये २६०० रुपये अशी एकून १३००० रुपये पगारवाढ देण्यात आलेली आहे. कामगाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या कामगारास तीन दिवसांची दुखवटा रजा भरपगारी मंजूर करण्यात आली आहे. कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कंपनीत एक कामगार कल्याण सोसायटीची स्थापना करण्यात येणार असून या सोसायटीसाठी लागणारे सुरु वातीचे भांडवल कंपनी देणार आहे. त्याचबरोबर दिवाळी सणाला एक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे. भरघोस पगारवाढीनंतर कामगारांनी उत्पादनवाढ आणि गुणवत्तेची हमी दिली आहे. या पगारवाढीच्या करारावर कंपनीच्यावतीने व्यवस्थापकीय-संचालक संजय जोशी, व्यवस्थापक एच आर देशमुख, यांनी स्वाक्षऱ्या केल्यात.