बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटविले , मनसेच्या मागणीनंतर झाला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:39 AM2017-12-10T05:39:30+5:302017-12-10T05:39:40+5:30
बोईसर येथील मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना सार्वजनिक बांधकाम खाते आणि बोईसर ग्रामपंचायतीने संयुक्त कारवाई करून शनिवारी हटविले.
पंकज राऊत / लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : येथील मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना सार्वजनिक बांधकाम खाते आणि बोईसर ग्रामपंचायतीने संयुक्त कारवाई करून शनिवारी हटविले.
कारवाईला काही फेरीवाल्यांनी विरोध केला मात्र या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. तर फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी मनसे आणि सिटीझन फोरम आॅफ बोईसर तर्फे तहसीलदाराकडे केली गेली होती. बोईसर येथील नवापूर नाका ते स्टेशन पासून चित्रालय पर्यंत चा मुख्य व प्रचंड रहदारी आणि वाहतूकीचा रस्ता फेरीवाल्यांनी व्यापल्याने सतत होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता त्या पासून सुटका मिळावी म्हणून मागील महिन्यांत त्यांना हटविण्यां संदर्भात मनसे चे माजी जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर च्या तहसीलदारांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते.
त्या बैठकीत तहसीलदार महेश सागर यांनी ग्रामपंचायतीच्या अधिनियमाचा कठोरपणे वापर करून अनिधकृतपणे बसणाºया फेरीवाल्यांना हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश पी .डब्ल्यू. डी. व बोईसर आणि सालवड ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दिले होते.
त्या अनुषंगाने फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली त्यामध्ये पी. डब्ल्यू. डी चे सहाय्यक अभियंता पालवे यांचे सह पी.डब्ल्यू. डी. चे अधिकारी आणि कर्मचारी तर बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबर, ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. तर मोहिमेकरीता बोईसर पोलिसांची मदत घेण्यात आली होती.
या मोहिमे दरम्यान मनसेचे माजी जिल्हा प्रमुख कुंदन संखे, उपजिल्हा प्रमुख अनंत दळवी, तालुका प्रमुख समीर मोरे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख भावेश चुरी, पदाधिकारी शिवाजी रेंबाळकर, चेतन संखे, आदी उपस्थित होते, तर भाजपाचे आशिष संखे यांनी अनेक वर्षा पासून सुरू केलेला आठवडा बाजार हटवू नये अशी मागणी उपस्थित अधिकाºयांकडे केली तर महिला भाजी विक्रेत्यांनी आमचा संसार याच व्यवसायावरती चालतो आम्हाला हटविले तर आमची उपासमार होईल असे संतप्तपणे सांगितले.