आठ महिन्यांसाठीच लाभले सभापतीपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:01 AM2021-01-09T01:01:33+5:302021-01-09T01:01:40+5:30
पालघर कृषी उत्पन्न बाजार समिती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल गावड यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल गावड यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, गावड यांच्या वाट्याला केवळ आठ महिनेच सभापतीपद येणार आहे.
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतीपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात आघाडी झाली. तिन्ही पक्षांनी २०-२० महिन्यांचा कालावधी सभापतीपदासाठी वाटून घ्यावा, या अटीवर आघाडी झाल्यावर काँग्रेसचे वासुदेव पाटील हे पहिले सभापती झाले. मात्र, २० महिन्यांऐवजी त्यांनी २६ महिन्यांचा कालावधी घेतला. दुसऱ्या टर्मसाठी बविआचे नागेश पाटील यांनीही २६ महिन्यांचा कालावधी घेतला. त्यामुळे उर्वरित ८ महिन्यांच्या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार, शुक्रवारी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दरम्यान राष्ट्रवादीचे अनिल गावड, काँग्रेसचे जगन्नाथ पावडे तर अपक्ष संजय पाटील यानी नामनिर्देशन पत्र भरले. निवडणूक होण्याआधीपासून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनील भुसारा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शहा, आ.श्रीनिवास वणगा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील आदींमध्ये बैठका होत खलबते सुरू होती. या बैठकीत सर्वांनी अनिल गावड यांच्या नावाला पसंती देत, अन्य कुणीही नामनिर्देशन पत्र न भरता, ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना आपल्या सदस्यांना दिल्या होत्या, तरीही तीन सदस्यांनी नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यादरम्यान जगन्नाथ पावडे आणि संजय पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने, अनिल गावड यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.