टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून तो भागवतो उपजीविका; कलेला गवसली दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 11:49 PM2020-07-02T23:49:03+5:302020-07-02T23:49:15+5:30
लॉकडाऊनमध्ये शोधला वेगळा मार्ग
प्रतीक ठाकूर
विरार : तसा तो फिल्म इंड्रस्टीवाला रंगभूषाकार, पण कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका त्यालाही बसला. घर कसे चालवायचे हा प्रश्न त्याच्यापुढेही उभा ठाकला होता, परंतु यातून हार न मानता त्याने उपजीविकेचा वेगळा मार्ग शोधला असून त्याला जवळचे मित्र आणि समाजातील इतर लोकांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. रुपेश प्रकाश पंडित या तरुणाने आपल्यातील आत्मविश्वास आणि प्रतिभेने तरुणांपुढे वेगळा आदर्श उभा केला आहे. त्याने चक्क टाकाऊ वस्तूतून टिकावू वस्तू तयार करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गेले ३ ते ४ महिने लॉकडाऊनच्या काळात घरीच बसून राहावे लागल्याने अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत घरगृहस्थी कशी चालवावी, हा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. मात्र म्हणतात ना, आपल्या नकारात्मक विचारांनी आपण संकटात सापडतो आणि आपली सकारात्मक बुद्धी आपल्याला मार्ग दाखवते, असेच रुपेशबाबत घडले आहे.
रूपेश म्हणाला की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून रंगभूषाकाराचे काम करतोय. गेल्या ३ महिन्यांपासून काम बंद आणि पुढचे अजून किती महिने काम चालू होईल याची काही कल्पना नाही. लॉकडाऊनच्या काळात खूप लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-मोठे उद्योग सुरू केले.
घरात आपल्या आठवणीसाठी जपून ठेवलेल्या जुन्या वस्तू कोणी फेकून दिल्या असतील, तर कोणी आठवण म्हणून ठेवून दिल्या असतील. तर त्या वस्तूंना एक नवीन रूप देण्याचे काम सध्या रुपेश करत आहे. त्याची सुरुवात त्याने आपल्या घरातूनच केली. यासाठी त्याने घरातील जुन्या बाटल्या, जुने स्टूल, मोबाईलचे बॉक्स, कुठलेही एखादे झाडाचे खोड, जुने प्लास्टिकचे डबे वगैरेतून आपल्या कलाकृती तयार केल्या आहेत. ज्या वस्तूला तुम्ही निकामी म्हणून पाहिले असेल ती एका आगळ्या-वेगळ्या रूपात तुमच्यासमोर आली तर... हेच काम सध्या रूपेश करत आहे. त्याला आता त्याचे काही मित्र आणि अन्य लोकही मदत करीत आहेत. त्यातून त्याला उपजीविकेसाठी पैसेही मिळू लागले आहेत. त्याने नैराश्य झटकून तरुणांना सकारत्मक विचार करण्यास प्रवृत्त केले असून वेगळा आदर्श ठेवला आहे.
संकटावर मात करणे शक्य
स्वत:मध्ये अशी काय कला आहे, ती बाहेर कशी काढायची, याचा विचार करा. तुमचे त्यात मन रमेल आणि नको ते विचारही डोक्यात येणार नाहीत. मग बाहेरच्या कोरोनाला आणि मनातल्या दडपणाच्या कोरोनासारख्या प्रत्येक संकटावर सहज मात करता येईल.
- रूपेश प्रकाश पंडित