आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आरोग्यकेंद्रांना अचानक भेटी, कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:09 AM2017-09-03T05:09:07+5:302017-09-03T05:09:11+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्र वारी आरोग्य यंत्रणेला पूर्वसूचना न देता डहाणू तालुक्याचा दौरा करून बालमृत्यू व कुपोषणाची माहिती घेतली.
बोर्डी : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्र वारी आरोग्य यंत्रणेला पूर्वसूचना न देता डहाणू तालुक्याचा दौरा करून बालमृत्यू व कुपोषणाची माहिती घेतली. त्यानंतर विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व खेडोपाड्यात गृहभेटीद्वारे आढावा घेतला.
डहाणूतील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने मंजुर करण्यात आलेल्या बालउपचार केंद्रास भेट दिली. या वेळी बालकं, त्यांचे पालक, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. शिवाय उपचार पद्धती, औषधसाठा, स्वच्छता तसेच प्रसूतीच्या संख्येत वाढ झाल्या बद्दल प्रशंसा केली. त्यानंतर सरावली उपकेंद्रातील पाटीलपाडा येथे गृहभेटीद्वारे दोन कुपोषित बालकांची विचारपूस करून आहार व औषधोपचार या बद्दल आरोग्य सेविका अशा कर्मचाºयांना सूचना दिल्या. त्याचप्रमाणे गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चारी पारसपाडा येथे बालमृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
या वेळी पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, डहाणू तालुक्याचे गटविकास अधिकारी राहुल धूम, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत चव्हाण तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
अधिकारी कर्मचाºयाची उडाली तारांबळ
तलासरी : राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी शुक्र वारी अचानक भेट देऊन तलासरीतील कुपोषित मुलाची पाहणी केली त्यामुळे अधिकाºयाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तालुक्यातील वडवली डोंगरीपाडा येथे भेट देऊन मॅम मध्ये असलेल्या कनिष्का परशु खरपडे या बालकाच्या घरी वापरात असलेल्या झोळी बाबत निरीक्षणे नोंदवून योग्य पर्याया बाबत मार्गदर्शन व सूचना केल्या.
तसेच मे मध्ये कुपोषणाने मृत्यू पावलेल्या समीर आंबोलकर या बालकाच्या घरीही जाऊन त्याच्या पालकाची विचारपूस केली व वडवली उपकेंद्राला भेट दिली व उपकेंद्रातील उपलब्ध औषध साठा व जोखमीची बालके व गरोदर मातांवरील उपचारांचा आढावा घेतला. या नंतर आमगाव आरोग्य केंद्राअंतर्गत डोंगारी विल्हातपाडा येथे कुपोषित नंदिनी खराड, अंकिता डावरे या बालकाच्या घरी भेट दिली व दत्तक बालक पालक योजने बाबत डोंगारी चे सरपंच सदाशिव खेवरा यांच्याशी चर्चा केली.
या भेटीच्या वेळी आरोग्यमंत्रांसोबत आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड , राहुल धूम गटविकास अधिकारी तलासरी , डॉ अजय ठाकरे , डॉ अभिजित चव्हाण, आनंद जाधव प्रकल्प अधिकारी तलासरी इत्यादिसह कर्मचारी उपस्थित होते.