पालघरमधील आरोग्यसेवा सहा वर्षांनंतरही ढेपाळलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:25 AM2021-03-10T00:25:40+5:302021-03-10T00:25:57+5:30

६४ एमबीबीएस डॉक्टरांची पदे मंजूर : १९ बीएएमएस डाॅक्टर कंत्राटी

The health service in Palghar is still in disarray after six years | पालघरमधील आरोग्यसेवा सहा वर्षांनंतरही ढेपाळलेलीच

पालघरमधील आरोग्यसेवा सहा वर्षांनंतरही ढेपाळलेलीच

Next

हितेन नाईक 

पालघर : पालघर जिल्हा आरोग्य विभागांतर्गत ८ तालुक्यांत एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३१२ उपकेंद्रे आहेत. या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ६४ एमबीबीएस डॉक्टरांची पदे मंजूर असून ४१ स्थायी पदे भरली आहेत. उर्वरित २३ रिक्त पदांपैकी १९ जागा एमबीबीएस डॉक्टरांऐवजी बीएएमएस डॉक्टरांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात आल्या आहेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तीन रिक्त पदांचा प्रभारी चार्ज एमबीबीएस डॉक्टरांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर आजही आरोग्य सेवा ढेपाळलेल्या अवस्थेत वाटचाल करीत आहे. 

जिल्ह्यात एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३१२ उपकेंद्रे आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत एकूण १४ लाख २८ हजार ६७८ हजार लोकसंख्येच्या जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहेत. दररोज साधारणपणे आरोग्य केंद्रांतून ५० हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागाद्वारे उपचार घेत असल्याची नोंद केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत एकूण १७१२ मंजूर पदांपैकी १२१५ पदे भरण्यात आली असून ४९७ पदे रिक्त आहेत. त्यापैकी सहाय्यक जिल्हा अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पुरुष व महिला आरोग्य सेवक, स्त्री परिचर आदी रुग्णसेवेशी निगडित महत्त्वपूर्ण अशा पदांचा समावेश आहे. 

या रिक्त पदांचा फार मोठा विपरीत परिणाम दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेवर पडून अनेक निष्पापांचे बळी योग्य उपचाराअभावी जात असल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. अशा रिक्त पदांमुळे वेळेवर उपचारच मिळत नसल्याने स्थानिक गरीब उपचाराअभावी मरणयातना भोगत आहेत. 
पूर्वी गरीब रुग्ण आपल्या घरातील रुग्णांना गुजरात, सिल्वासा या जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात नेत असल्याने गरीब रुग्णांची होणारी ससेहोलपट काही काळासाठी थांबली होती, मात्र कोरोना काळात या रुग्णालयाची सेवा परजिल्ह्यातील रुग्णांसाठी बंद केली जात असल्याने गंभीर आजाराच्या रुग्णांना ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टरांच्या औषधांवर नाईलाजाने तोकडे उपचार करून घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचा योग्य उपचाराअभावी तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. 

तालुकानिहाय केंद्रे  व मंजूर, रिक्त पदे  तलासरी तालुक्यात एकूण 
४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, डहाणू तालुक्यात ९,जव्हार 
४, विक्रमगड ३, मोखाडा ४, वाडा ४, पालघर १०, वसई 
८ अशी एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून १९ जागा एमबीबीएस डॉक्टरांच्या रिक्त आहेत. जाहिरात देऊनही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या जागी कंत्राटी पद्धतीने बीएएमएस डॉक्टर भरण्यात आले आहेत. 

रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. परंतु एमबीबीएस जागेसाठी एकही उमेदवार उपस्थित न राहिल्याने बीएएमएस डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. 
- डॉ. संतोष चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर

Web Title: The health service in Palghar is still in disarray after six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.