मोखाड्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; कायमस्वरुपी बालरोगतज्ज्ञ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:13 AM2020-02-26T00:13:13+5:302020-02-26T00:13:16+5:30
मंजूर २७ पदांपैकी नऊ पदे रिक्त; एक रुग्णवाहिका नादुरूस्त
- रवींद्र साळवे
मोखाडा : संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेणारे ग्रामीण रुग्णालयच रिक्त पदांमुळे व्हेंटिलेटरवर असून तीस खाटांची संख्या असलेल्या सरकारी ग्रामीण रुग्णालयास कोणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी तसेच बालरोगतज्ज्ञ देता का? अशी विचारणा तालुक्यातील नागरिक करत आहेत.
या ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदे मंजुर असून जवळपास ९ पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ३ पदांपैकी दोन पदांच्या नेमणुका कायम आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे यांची प्रतिनियुक्ती पालघर जिल्हा आरोग्य विभाग येथे करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. शिंदे हे आठवड्यातून एखाद दुसºया दिवशी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हजेरी लावतात. जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यूने कुप्रसिद्ध असलेल्या मोखाडा तालुक्याला कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञची आवश्यकता असतानाही बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक जिल्ह्याला कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यात जरी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे असली तरी प्राथमिक उपचार आणि दुर्धर आजारांवरील उपचार, बाळंतपण, सर्पदंश अशा अनेक उपचारासाठी रुग्ण तालुक्याला धाव घेतो. दिवसभरात २०० ते २५० विविध आजारांनी त्रस्त नागरिक बाह्य रुग्ण विभागात येत असतात. रिक्त पदांच्या अनुशेषामुळे आणि कर्मचारी संख्या कमी असल्याने रु ग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांत नेहमी खटके उडत असतात. कधी किरकोळ आजारांवर उपचार न करताच जव्हार किंवा नाशिकवारी करण्याची वेळ रुग्णांवर येते.
रिक्त पदांमुळे येथील कर्मचाºयांना सरकारी रुग्णालय चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्याचा परिसर डोंगर दरी खोºयात आणि दूरवर विखुरलेला असल्याने ग्रामीण रुग्णालयातील रु ग्णांना ने-आण करण्यासाठी असलेल्या दोन रुग्णवाहिकांपैकी एक रूग्णवाहिका नादुरुस्त असून या रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी जवळपास दीड दोन लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे कर्मचाºयांकडून समजते. त्यामुळे एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णांना ने-आण करावी लागते आहे. १०८ या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना ने-आण करण्याचा भार हलका झालेला असला तरीही वेळप्रसंगी खाजगी वाहनांचा वापर करून रुग्णांना नाशिक, मुंबई, ठाणे येथील दवाखाने गाठावे लागत आहेत. गेले वर्षभर पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामीण रुग्णालयाची नळपाणी योजना यंदा पूर्ववत झाली असली तरी अधूनमधून नळपाणी पुरवठा करणाºया लाईनला गळती लागत असल्याने सुरळीत पाणीपुरवठा होणे कठीण होते आहे.
विविध विभागातील ९ पदे रिक्त आहेत. त्यातील काही पदे जिल्हा परिषद विभागाच्या फंडातून तापुरत्त्या स्वरूपात भरली आहेत.
-किशोर देसले, तालुका आरोग्य अधिकारी मोखाडा
मी या अगोदरही सभापती असताना वेळोवेळी आरोग्य विभागातील रिक्त पदाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेत हा प्रश्न मांडून सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू.
- सारिका निकम, सभापती
मोखाडा पंचायत समिती