बिलाचा आकडा ऐकून रुग्णाने ठोकली रुग्णालयातून धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:40 AM2020-07-28T00:40:22+5:302020-07-28T00:40:26+5:30
विरारमधील घटना : विजय वल्लभ रुग्णालयातील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. अशातच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नाहीत म्हणून काही नागरिक खाजगी रुग्णालयांकडे उपचारासाठी वळतात, मात्र काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले लावून रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याने रुग्णांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाने कोरोनाग्रस्त रुग्णाला
दीड लाखांचे बिल आकारल्याने बिलाचा आकडा ऐकूनच रुग्णाने रुग्णालयातून धूम ठोकल्याचा प्रकार घडला आहे.
विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रु ग्णालयात १२ जुलै रोजी एक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाला होता. पाच-सहा दिवस उपचारांनंतर रु ग्णाची तब्येत सुधारल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्याचे ठरले. या वेळी ५-६ दिवसांच्या उपचाराचे बिल दीड लाखाच्या घरात आल्याचे समजताच रुग्णाने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे, सांगत रुग्णालयातूनच पळ काढला. डॉक्टरांनी या रुग्णाला फोन केल्यानंतर मी सर्वांना बाधित करेन, अशी धमकी रुग्णाने डॉक्टरांना दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या रु ग्णाचा शोध सुरू आहे. या आधीही महाराष्ट्रात अनेक रु ग्ण उपचारादरम्यान हॉस्पिटलमधून पळून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे वसई-विरारमध्ये सलग चार महिन्यांपासून कोरोनामुळे असलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. हातचे रोजगार, कामधंदा ठप्प असल्याने रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यमवर्गीय नागरिकांसमोर तर इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
वसई-विरारमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये चांगले उपचार होणार नाहीत, या भीतीपोटी अनेक लोक खाजगी रुग्णालयांना पसंती देतात, मात्र कोरोनावर खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाºया सर्वसामान्य मध्यमवर्गीय रुग्णांची अवस्था बिकट झालेली आहे. कोरोनासारख्या आजारावर रुग्णालये आकारत असलेली अव्वाच्या सव्वा बिले हा संतापाचा विषय ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी लाखो रुपये आणायचे कोठून? असा सवाल नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे.