वसई-विरारमध्ये भीषण जलप्रलय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:47 AM2018-07-10T03:47:12+5:302018-07-10T03:47:17+5:30

कोकण विभागात सोमवारी सर्वाधिक पावसाची नोंद वसई तालुक्यात २३२.५० मि.मी. एवढी झाली आहे. त्यामुळे वसई तालुक्यात हाहा:कार उडाला आहे. तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात असून त्याची तो फक्त ९.४ मिमी इतका आहे. पालघर जिल्ह्यातील सोमवारचा एकूण पाऊस १२७.४ मि.मी इतका राहिला.

 Heavy Flood in Vasai-Virar | वसई-विरारमध्ये भीषण जलप्रलय

वसई-विरारमध्ये भीषण जलप्रलय

Next

पालघर - कोकण विभागात सोमवारी सर्वाधिक पावसाची नोंद वसई तालुक्यात २३२.५० मि.मी. एवढी झाली आहे. त्यामुळे वसई तालुक्यात हाहा:कार उडाला आहे. तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात असून त्याची तो फक्त ९.४ मिमी इतका आहे. पालघर जिल्ह्यातील सोमवारचा एकूण पाऊस १२७.४ मि.मी इतका राहिला.
वसई पाठोपाठ डहाणू तालुक्यात १७९.३ मिमी, तलासरी १४७.५ ,पालघर १३१.३ , विक्र मगड ९६.०५, जव्हार २७, वाडा १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व वाडा तालुके डोंगराळ भागात असल्याने इथे पावसाची शक्यता जास्त होती मात्र या भागात पाऊस त्यामानाने कमी आहे.
मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका वसई तालुक्याला बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळ पासूनच विस्कळीत झाली होती.मुंबई कडे जाणाऱ्या अनेक गाड्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या विविध स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू, विक्र मगड, वाडा तालुक्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्याने रस्त्यावरु न पाणी वाहू लागले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

रविवार ते सोमवारी सकाळपर्यंत २३५ मिमी पावसाची नोंद !

वसई : मागील चार दिवस बरसणाºया तुफान पावसामुळे जवळपास संपूर्ण वसई तालुकाच पाण्याखाली गेला असल्याचे सर्वत्र चित्र असून वसई विरार मधून पालघर आणि मुंबईच्या दिशेने जाणाºया मुख्य रस्त्यांना नद्यांचे रूप आल्याने ते पूर्ण दिवस बंद झाले होते. वसईच्या ग्रामीण व शहरी भागात झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणचे रस्ते कालवे बनले होते. वसई अंबाडी रोड,गोखिवरे ,सातिवली आदी भागातील वाहतूकच दिवसभर बंद होती, नवघर भागातून नालासोपारामार्गे विरार ला जाणारा प्रसिद्ध असा सनिसटी -गास हा मुख्य रस्ता पूर्णत: पाण्याखाली गेला होता.

वसईत सोमवारी सकाळी ८ वाजे पर्यंत २३५ मिमी पावसाची नोंद झाली असून १ जून पासून ते ९ जुलै पर्यंतच्या सकाळपर्यंत एकूण १३४३ मी मी इतक्या पावसाची नोंद झाली असल्याची माहिती वसई तहसीलदार कार्यालयाने दिली आहे. यामध्ये मांडवी १९८ आगाशी २४७ निर्मळ २२७ विरार २७६ माणकिपूर २१२ आणि वसई २३५ अशी गाव निहाय पावसाची नोंद आहे. वसई तालुक्याचा शहरी भाग, पश्चिम पट्ट्यातील रस्ते व सखल भाग पूर्णत: जलमय झाले असून सोमवारी शेकडो लोकांचे स्थलांतर विविध ठिकाणी करण्यात आले आहे. घराघरात व दुकानात तसेच हाऊसिंग सोसायट्यांच्या आवारात पाणी घुसले होते.

वसई पूर्व ,पश्चिम नवघर व वसई गावातून वाहतूक करणाº्या रिक्षांना पाण्यातून जावे लागल्याने त्या बंद पडल्या होत्या. तर पाणी साठलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना बाहेर पडणे व रस्त्यावरून चालणे हि कठीण होऊन बसले होते. कामगार वर्गाला व शाळेंना सुट्टी मिळाली. पण चाकरमान्यांचे हाल झाले. वसई पूर्वेला गोखिवरे, वालीव,सातीवली येथेही प्रचंड पाणी साचले . येथील औद्योगिक पट्टयांत प्रचंड पाणी साचल्याने या ठिकाणची सर्वच वाहतूक बंद झाली होती. त्यातच पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे हजारो कामगारांना सोमवारी कामावर जाणे शक्य झाले नाही. तर रात्रपाळी करणाºयांना घरी जाता आले नाही.

मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी साचल्याने लोकल गाड्या उशिरानं धावत होत्या त्यामुळे चाकरमान्यांचेही हाल झाले तर वसईतील शाळा व कॉलेजना हि सुट्टी देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वसई पूर्वेतील वाहतूक थांबवून तिचे नियोजन केले. सतत पडणार्या पावसाने वसंत नगरी, एव्हरशाईन येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच सनिसटी-गास रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्याने पूर्ण भरला होता. याठिकाणी हि पालिकेची आपत्कालीन यंत्रणा लक्ष ठेऊन होती.

पावसाने रेल्वे, एसटी ठप्प; चाकरमान्यांचे हाल

बोर्डी : जिल्ह्याला पावसाने जोडपले असून विविध भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प होऊन प्रवासी वेगवेगळ्या स्थानकावर अडकले . आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी दांडी मारावी लागल्याने नाराजीचा सूर होता. सोमवारी सकाळी नालासोपारा येथे रु ळावर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. तथापि लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या डहाणू रोड, वाणगाव पासून ते थेट विरारपर्यंतच्या अनेक स्थानकांवर थांबविण्यात आल्या. गेल्या आठवड्यात अंधेरी येथील गोखले पूलाचा काही भाग रेल्वे रुळावर पडून पश्चिम रेल्वेने वाहतूक थांबवली परिणामी प्रवाशांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली होती. तर या आठवड्याची सुरु वात दांडीने झाली.

सोशल मीडियावार सुरूवातीचे काही तास पावसाने रेल्वे कुठे आणि कोणत्या भागात थांबविण्यात आल्या या विषयीचे फोटो प्रवाशांनी पाठविले. त्यानंतर मात्र रेल्वे सेवा तसेच प्रशासनाला लक्ष्य, टीका करणारे फोटो व व्हिडिओ पाठविले गेले. पूर्वी पाऊस पडल्यावर कविता सुचावायच्या आता मात्र फक्त बोजवारा उडतो,
रु ळ पाण्यात बुुडल्याने त्यावरून होणारी वाहतूक म्हणजे पाण्यावर धावणारी लोकल सेवा हा रेल्वे प्रशासनाचा नवा आविष्कार. पाच दिवसाचा आठवडा करण्याची परे ला घाई या पद्धतीचे मेसेज दिवसभर फिरत होते. मागील चोवीस तासात तालुक्यातील पाच मंडळातील गावांमध्ये ३५३.६ मिमी पाऊस झाला. डोंगरी भागा पेक्षा किनारी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

डहाणूला मुसळधार पावसाने झोडपले

डहाणू : तालुक्याला मुसळधार पावसाने गेल्या सात आठ दिवसांपासून झोडपून काढले असून, नद्या नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या चौवीस तासात ३५३.६ मी.मी तर १५ दिवसात१३६०.९ मी.मी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने भात पेरण्या वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. रविवारपासून मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे सर्व वाहतूक ठप्प होवून जनजीवन विस्कळीत झाले आहे. एस टी बस वाहतूक आणि रिक्षा वाहतूक बंद झाल्याने शाळा महाविद्यालयातही अल्प उपस्थिती होती. तसेच सरकारी कार्यालयातही नगण्य उपस्थिती होती.

पावसाची आणीबाणी, अर्नाळ्यात घरांत पाणी

पारोळ : वसई तालुक्यात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने पुन्हा एकदा वसई, विरार, भागातील रस्त्यांना नदीचे रूप येत दोन ते तीन फुट पांणी आल्याने बोळीज गावातून खारोडी कडे जाणारा मार्ग, तोर भाट ते खिवणी, रुमाव आळी ते बावखाल, गोकुळ टाऊनशीप ते जकात नाका वसई पूर्व भागातील एव्हरशाईन सिटी , वसई देव तलाव ते वासळई , वसई सांडोर चुळणे , या मार्गासह वसई पूर्व व पश्चिम भागातील अनेक मार्ग पाण्याखाली गेले. या पूरस्थितीचा फटका अर्नाळ्यालाही बसला. घरे व रिसॉर्टमध्ये पाणी भरले.
तर मिठागर भागात शंभर घरात पाणी घुसल्याने चारशे नागरिकांना वसई तहसीलदारांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे तर उमराळे येथील आदिवासी पाडा पाण्याखाली गेल्याने तेथील अकरा कुटुंबाना महापालिकेच्या समाज गृहात हलविले आहे.

बोईसर - तारापूरला रात्रभर मुसळधार पाऊस
बोईसर : तारापूर - बोईसर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस पडून २४ तासात १८४ मि. मी. पाऊसाची नोंद झाली आहे. बैठ्या चाळी, बिल्डिंग व एमआयडीसी मध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचून अनेक रस्त्यावरून पाणी दुथडी भरून वाहत होते त्या मुळे वाहतूक ठप्प झाली होती तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती त्या मुळे चाकरमान्यांना परतीचा रस्ता धरावा लागला. या हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस पडला. दोन चार दिवसांची विश्रांती घेऊन तो पुन्हा जोरदार कोसळतो आहे. यामुळे पेरा वाया गेल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. तर बागायतदारही हवालदिल झाला आहे.

बळीराजा उशिरा परंतु दमदार पडल्यामुळे सुखावला असला तरी आता भातरोपाच्या पोषक वाढी करीता तो कधी विश्रांती घेतो याची वाट तो पाहतो आहे. मुसळधार पावसाने बोईसर -चिल्हार रस्त्यावरील बेटेगाव, बोईसर - पालघर रस्त्यावरील सरावली, तारापूर माळी स्टॉप - मोठे कुडण रस्त्यावरील करण खाडी, बोईसर पूर्वेकडील लोखंडी पाड्याला जोडणारा पूल इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साठून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. आता पावसाने उसंत न घेतल्यास हीच स्थिती मंगळवारीही कायम राहण्याची शक्यता आहे.

बोईसर येथील साईबाबा नगर, यशवंत सृष्टी, अमेय पार्क इत्यादी अनेक मोठया नागरी वसाहतीत तसेच भीमनगर ,सिडकोसह अनेक बैठ्या चाळीतही पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. तारापूर एम.आय.डी. सी. मधील काही भागामध्ये प्रचंड पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते,तर नित्यनियमाप्रमाणे विजेचा लपंडाव सुरूच होता. मुसळधार पावसाने बोईसरसह परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे नागरिकांची अक्षरश: त्रेधारितरपीट उडाली होती. तर आधी लांबलेल्या पावसामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता तर आता एकदम पाऊस पडत असल्याने बळीराजाची चिंता अधिक वाढली.

Web Title:  Heavy Flood in Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.