आगरी सेनेचा शुक्रवारी हाय वे रोको, प्रलंबित मागण्यांची लावणार तड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:33 AM2019-02-06T02:33:34+5:302019-02-06T02:33:49+5:30

भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे.

Heavy high stop on the Agri Season Friday, pending demands will be tightened | आगरी सेनेचा शुक्रवारी हाय वे रोको, प्रलंबित मागण्यांची लावणार तड

आगरी सेनेचा शुक्रवारी हाय वे रोको, प्रलंबित मागण्यांची लावणार तड

Next

वसई  - भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. विकासात भूमीपूत्रांना स्थान दिले जात नाही. अशा अनेक मागण्या घेऊन येत्या शुक्र वारी (दि.८) पालघर जिल्हा आगरी सेना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. आगरी सेना नेते कैलास पाटील, आगरी सेना वसई अध्यक्ष भूपेश कडूलकर तसेच पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरसाड नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८ वर सकाळी १० वाजता चक्का जाम करण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक आदी परिसरात आगरी-कोळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. त्यावेळी मोठे मन करून त्यांनी विकासाला जागा दिलेल्या आहेत. पण आता पुन्हा मोठ्या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. मात्र त्यांना कवडीमोल भावाने मोबदला दिला जातो. त्यांना रोजगार दिला जात नाही. मच्छीमारांना नुकसान भरपाई, वाढीव घरपट्टी, नोक-यांमध्ये आरक्षण, वाढीव वीजबिले, पाणी प्रश्न, म्हाडाचा रखडलेला गृहप्रकल्प, डबघाईस आलेला रेती व्यवसाय, पालिका क्षेत्रातील बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष, माहितीच्या अधिकाराची पायमल्ली, नारंगी जवळचा नियोजीत उड्डाणपूल, महामार्गानजीक नवीन पोलिस चौकी सुरु करणे आदी मागण्यांसाठी आता आगरी समाज एकवटून आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहे. त्यासाठी पालघर जिल्हा आगरी सेनेने राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोकोची हाक दिली आहे.या रास्ता रोकोत पन्नास हजाराहून अधिक आगरी समाजबांधव सहभागी होणार आहेत.
पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पात भूमीपुत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांमध्ये आरक्षण मिळावे अशी आमची मागणी असल्याचे आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी सांगितले. सध्या ओ.एन.जी.सी.च्या सागरी सर्वेक्षणामुळे दोन महिने मच्छिमारी बंद ठेवावी लागली आहे, त्याचा मोठा फटका मच्छिमार बांधवांना बसतो आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीमूळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे, त्यामुळे घरपट्टीत वाढ करण्यात येऊ नये. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन,मुंबई बडोदरा महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पात बाधित शेतक-यांना योग्य मोबदला न मिळाल्यास विरोध केला जाणार आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामूळे वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यात सुधारणा करून दिलासा देण्यात यावा. पाणि जोडणीसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते, ती थांबवावी. बांधकाम व्यावसायिकांकडूनही फूटामागे पैसे लाटले जात आहेत, याची चौकशी करण्यात यावी. पालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे १९८७ पासून बोळींज येथील म्हाडाच्या रखडलेल्या प्रकल्पाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. घोडबंदर ब्रीजजवळ ड्रेजरने रेती उत्खनन केले जाते, मात्र स्थानिक भूमीपूत्रांना गावाजवळील खाडीत रेती उपसा परवानगी दिली जात नाही. ती द्यावी आदी मागण्या केल्या गेल्या आहेत.

अनेक वर्षांपासून मागण्या आहेत प्रलंबित

पालिका क्षेत्रात अनेक प्रकल्प उभे राहत असताना,पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.वसईत वेट लॅण्ड झोन उठवून तेथे रेसिडेंटल झोन होत आहे. त्यामुळे समूद्राचे खारे पाणी गावात घुसून पूराचा धोका निर्माण होऊ लागला आहे.

नारंगी गावाजवळ उड्डाणपूल बांधण्यात यावा ,तसेच राष्ट्रीय महामार्गालगत शिरसाड-भाताणे-चांदिप परिसरासाठी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी अशा विविध मागण्या असल्याचे जनार्दन पाटील यांनी सांगितले.

स्थानिक भूमिपूत्रांच्या अस्तीत्वाच्या लढाईसाठी, मागण्यांसाठी आगरी सेनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करण्यात येणार आहे. पन्नास हजारांहून अधिक भूमिपूत्र या लढ्याला पाठींबा दर्शविणार आहेत. सत्ताधा-यांना याची नोंद घ्यावीच लागेल.
- जनार्दन (मामा) पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा आगरी सेना.

Web Title: Heavy high stop on the Agri Season Friday, pending demands will be tightened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.