डहाणूमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:56 AM2019-09-15T11:56:21+5:302019-09-15T11:57:33+5:30
डहाणू तालुक्यात रविवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - डहाणू तालुक्यात रविवारी (15 सप्टेंबर) पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाची तीव्रता अधिक असून कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने या शहरात सखल भागात पाणी साचले आहे. तसेच मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर वीजही खंडीत झाली आहे.
डहाणू रोड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडून तारपा चौक या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काही युवक मदातकार्यकरिता पुढे आले असून मानवी साखळी निर्माण करून नागरिकांना पाण्यातून पुढे जाण्यास मार्गदर्शन करीत आहेत. ग्रामीण भागातील नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले असून काही भागातील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दरम्यान नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी शहरात पाणी न तुंबण्याचा केलेला दावा फोल ठरल्याने त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटत असून नगर परिषदेच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवणाऱ्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.