पालघरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:26 PM2019-07-01T14:26:56+5:302019-07-01T14:28:09+5:30
पालघरमधील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने संबंधित गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पालघर:- जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने संबंधित गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वसई-विरार शहर महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटण फिल्टर प्लांट येथे गेले दोन दिवस अति वृष्टी होत असल्याने पूर्ण मासवण पंपिंग स्टेशनला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने मासवण पंपिंग स्टेशन पूर्ण पणे बंद आहे.
मराविम(MSEB)च्या मासवण येथील सबस्टेशन मध्ये झालेला बिघाड झाल्याने दुरुस्ती करण्यात अडचणीत येत आहेत. तसेच धुकटण फिल्टर प्लांट येथे ही पुराचे पाणी गेल्याने धुकटण फिल्टर प्लांट ही पूर्ण पणे बंद आहे, त्यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. पाणीपुरवठा सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर होणारा पाणीपुरवठा हा अनियमित व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे. तर दुसरीकडे पालघर-मनोर रस्त्यावरील गोवाडे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचा अडीच एकरावरील तलाव फुटल्याने हे पाणी रस्त्यावर येत काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.