मेघगर्जनेसह वाड्यात जोरदार पावसाच्या सरी; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 08:10 AM2020-10-15T08:10:13+5:302020-10-15T08:10:20+5:30
पालघर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी : भातपीक वाया जाण्याची भीती; बाेटींना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश
पालघर : मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा देण्यात आला असला तरी जिल्ह्यातील शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत. समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे १६ ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये,असा इशारा दिला आहे. जे मच्छीमार समुद्रामध्ये आहेत, त्यांनी आपल्या बंदरांमध्ये सुरक्षित ठिकाणी यावे, असा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवडाभरापासून झाई ते वसई दरम्यानच्या किनारपट्टीवर शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत. सहकारी संस्थांमधून त्यांना माघारी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे एमडी पंकज म्हात्रे यांनी सांगितले.
मेघगर्जनेसह वाडय़ात मंगळवार संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारीही संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतक:यांनी शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताचे पीक तयार होऊन त्याची कापणी सुरू झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात कापून ठेवलेले पीक भिजले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाताचे दाणो शेतातच गळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर मजूरटंचाई, वाढलेले मजुरीचे दर अशा अनेक संकटांवर मात करून मोठय़ा हिमतीने भातपिकाची लागवड केली. त्यानंतर, समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही जोमात आले. नेमके कापणीच्या वेळी पावसाचे संकट उभे ठाकल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तयार पिकाला पाणी लागले, तर तांदूळ दाण्याच्या गुणवत्तेत फरक पडतो. तसेच कडबादेखील जनावरांना खाण्यालायक राहत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीवर केलेला खर्च कसा भरून काढायचा, या चिंतेत ते सापडलेत.