डहाणू, जव्हार येथे जोरदार अवकाळी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:16 AM2019-10-23T01:16:27+5:302019-10-23T06:15:30+5:30
शेतकऱ्यांचे नुकसान, कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी
कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. नाले, ओहोळ यांना पूर आला आहे. शेते पाण्याने भरली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कापलेली पीक पाण्याखाली गेली आहेत.
तालुक्यातील कासा भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच ते तीन तास ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. कासा भागातील कासा, चारोटी, वाघाडी, वेती, वरोती, तवा, पेठ, आंबेदा, नानीवली, उर्से, साये, निकावली, म्हसड, आंबिवली, महालक्ष्मी, खाणीव, सोनाळे आदी गावामध्ये शेतकऱ्यांनी कापलेल्या भाताची कडपे पाण्यावर तरंगू लागली आहेत तर काही वाहून गेली आहेत. परिणामी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले.
कासा भागात कापलेली भात पीक सहा सात दिवसापासून शेतातच आहेत. पाच दिवसात काही प्रमाणात पाऊस झाल्याने तेव्हा दाणे रुजले आहेत तर कडपे कुजायला लागली आहेत. सोमवारी दिवसभर उघाड दिल्याने शेतातील कडपे सुकण्यासाठी शेतकºयांनी पलटी केली तर काही शेतकºयांनी मंगळवारी सकाळपर्यंत भात कापणी केली. मात्र मंगळवारी दुपारी तीन वाजेनंतर पावसाने जोरदार सुरु वात केली अडीच ते तीन तास पाऊस झाला. त्यामुळे पूर आला असून शेते पाण्याने भरली आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
मोखाडा : तालुक्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस धो-धो बरसत असल्याने हळव्या भातपिकाला नुकसानीचा फटका बसला आहे. गेल्या सात - आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीची दाणादाण उडवली आहे. दुपारनंतर आकाशात ढगाळ पावसाळी वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस पडत आहे.
पालघर जिल्ह्यात एक लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली होती. यामधील ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. यामधील २ हजार ३७ हेक्टरमध्ये भात लागवड करण्यात आली आहे. हळव्या जातीतील भात पीक कापणीसाठी तयार झाली आहेत.
पावसाळा भर रुसवे फुगवे दाखवून शेतकºयांना चिंतेत टाकलेल्या पावसाने जाता जाता नागली, वरई या पिकाला काही अंशी आधार दिल्याने शेतातील पिके सावरली असून हळूहळू शेतकºयाने तयार झालेले भात पीक खळ्यावर आणण्यासाठी लगबग सुरु केली, परंतु पावसाच्या लहरीपणामुळे शेतात उभारलेले भात पीक व कापणी केलेल्या कडप्यांची नासाडी होऊन भाताचे दाणे काळे पडण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसाचा फटका
जव्हार : जव्हार हा ९९ टक्के आदिवासी तालुका असून येथील खेडापाड्यातील आदिवासी बांधव शेतीवर आणि मजुरीवर अवलंबुन असतो. मात्र आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकºयांच्या पिकांवर पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.
च्पावसाळा सप्टेंबर अखेर संपतो. मात्र यंदा आॅक्टोबरच्या अंतिम आठवड्यातही जोरदार पाऊस असून यामुळे येथील शेतकºयांच्या भात, नागली, वरई, उडीद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वर्षभरात शासनाकडूनही कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही.
रोजगार नसला तरी शेतीतील पीक खाऊन जगणारा आदिवासी संकटात सापडला आहे. या पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. दरम्यान, एकीकडे शासनाकडून रोजगार नाही तर दुसरीकडे अस्मानी संकट, या कचाट्यात शेतकरी सापडला आहे.
डहाणूत भातपिकांचे नुकसान
डहाणू : डहाणू तालुक्यात चार-पाच दिवसापासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू असून शेतकºयांनी तयार भातपिकाची कापणी मोठ्या प्रमाणावर केली होती. मात्र, ती कालपासून सुरू असलेल्या पावसाने पूर्ण भिजून गेली. त्यामुळे डहाणू तालुक्यातील शेतकºयांचे करोडोचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भात पिकाचे सरकारने पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.
काही दिवसांपासून डहाणूत वादळी वाºयासह परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे रोगांनी खाल्लेली भात पिके, शेतकºयांनी कापणी करून ती खाचरात सुकण्यासाठी टाकली होती. परंतु भात खाचरात पाणी भरल्याने भिजून त्यावर अंकुराच्या माळा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे करोडोचे नुकसान झाले आहे. चिकू बागायतदार शेतकºयांना या पावसाचा फटका बसला आहे.