वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी, जि.प.च्या सहापैकी चार जागांवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:40 AM2020-01-09T00:40:45+5:302020-01-09T00:41:00+5:30
वाडा तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवला आहे.
वसंत भोईर
वाडा : वाडा तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून या निवडणुकीत मात्र भाजपाचा सुपडासाफ झाला आहे. तर पंचायत समितीत राष्ट्रवादी चार, शिवसेना चार, भाजप दोन तर मनसे आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
कुडूस जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे राजेश मुकणे हे २, १७४ मताधिक्क्याने विजयी झाले. आबिटघर गटातून राष्ट्रवादीचे नरेश आकरे विजयी झाले असून त्यांनी सेनेच्या शरद पाटील यांचा पराभव केला तर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांना तिसऱ्या क्र मांकावर समाधान मानावे लागले. पालसई गटातून राष्ट्रवादीचे शशिकांत पाटील विजयी झाले. त्यांनी भाजपच्या मंगेश पाटील यांचा पराभव केला. मांडा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अक्षता चौधरी तर गारगाव गटातून राष्ट्रवादीच्याच रोहिणी शेलार विजयी झाल्या असून मोज गटातून शिवसेनेच्या अनुष्का ठाकरे या विजयी झाल्या आहेत.
कुडूस गणातून शिवसेनेच्या अस्मिता लहांगे तर चिंचघर गणातून शिवसेनेचे राजेश सातवी हे निवडून आले आहेत. गालतरे गणातून शिवसेनेचे योगेश गवा आणि खुपरी गणातून शिवसेनेचे अमोल पाटील हे प्रचंड मताने विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे शामकांत मोकाशी यांचा पराभव केला. आबिटघर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील हे विजयी झाले आहेत. मांडा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता फराड या २५५० मते मिळवून विजयी झाल्या आहेत. डाहे गणातून रघुनाथ माळी हे विजयी झाले आहेत. गारगाव गणातून पूनम पथवा जिंकल्या आहेत. पालसई गणातून भाजपच्या सुवर्णा पडवले तर केळठण गणातून भाजपच्या कृपाली पाटील विजयी झाल्या आहेत. सापने बुद्रुक गणातुन मनसेच्या कार्तिका ठाकरे विजयी झाल्या असून मोज गणातून अपक्ष उमेदवार सागर ठाकरे जिंकले आहेत.
>अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
मोज गणातील अपक्ष उमेदवार सागर ठाकरे हे दोन मतांनी विजयी झाले आहेत. सागर ठाकरे व शिवसेनेचे दिनेश पटारे यांना मतपेटीत १७२५ अशी समसमान मते मिळाली. पोस्टाद्वारे सहा मते आली होती. त्यात चार मते सागर यांना तर दोन मते दिनेश यांना मिळाली. यात दोन मतांनी अपक्ष उमेदवार सागर ठाकरे विजयी झाले आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.
>गारगाव गटात तीनही जागांवर राष्ट्रवादी
गारगाव गट, गारगाव गण आणि डाहे गण अशा तिन्हीही जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गारगाव गटात गेल्या वेळेस शिवसेनेची सत्ता होती. मात्र या सत्तेला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे.
दिग्गजांना पराभवाचा झटका
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांचा आबिटघर गटातून तर पत्रकार शरद पाटील यांचा याच गटातून पराभव झाला. भाजपचे युवा कार्यकर्ते मंगेश पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि माजी सभापती संतोष बुकले, शिवसेनेचे तालुका प्रमुख यांचे बंधू दिनेश पटारे यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली.