यूपीएससीत वाड्याचा हेमंता पाटील कोकण विभागात पहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:52 AM2019-04-08T00:52:45+5:302019-04-08T00:52:56+5:30
देशात ३९ वा तर महाराष्ट्रात पाचवा : वडील शिक्षक, आई दहावी पास तरीही आश्रमशाळेतील शिक्षणाच्या जोरावर मेहनत करून प्राप्त केले सुयश
- वसंत भोईर
वाडा : पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील शिलोत्तर (पीक) या खेडेगावातील एका शिक्षकाचा मुलगा हेमंता केशव पाटील हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) २०१८ मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण कोकण विभागात पहिला आला आहे. तर संपूर्ण देशात ३९ वा व महाराष्ट्रात पाचव्या क्र मांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
पालघर जिल्ह्यात वाडा तालुका हा शैक्षणकि दृष्टीने अग्रेसर मानला जात असून या पूर्वी (सन २०१२) याच तालुक्यातील चिन्मय प्रभाकर पाटील (रा. पीक) व यतिश गजानन पाटील (रा. कासघर ) या दोन विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. विशेष म्हणजे हेमंता पाटील यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण तलासरी येथील ठक्कर बाप्पा आश्रम शाळेत झाले आहे व ११ वी ते १२ वीचे शिक्षण वाडा येथील आ.ल. चंदावरकर या कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. या महाविद्यालयात बारावीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्यातील लोणेर येथे केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तेथेही तो गोल्ड मेडालिस्ट ठरला.
हेमंताने गुजरात मधील अंकलेश्वर येथे नोकरी करीत असताना मागील वर्षी युपीएससी परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो देशात ६९६ रँकमध्ये येऊन तो आय. आर. एस. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस या स्ट्रीममध्ये तो यशस्वी ठरला होता. मात्र हेमंत तेथेही न थांबता त्याने पुन्हा कठोर मेहनत करु न पुन्हा परीक्षा दिली आणि आता तो देशात ३९ वा तर राज्यात पाचवा व कोकण विभागात पहिला यशस्वी ठरला आहे.
हेमंताचे वडील केशव पाटील हे साध्या शेतकरी कुटुंबातील असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत.हेमंताची आई गृहीणी असून ती अवघी दहावी पर्यंत शिकलेली आहे. दरम्यान हेमंताच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. त्याच्या वडीलांनी तलासरीसारख्या आदिवासी भागात शिक्षकी पेशा पूर्ण करुन आपल्या मुलांना संस्कार व शिक्षण दिल्यामुळेच हे यश नातवाने मिळविले असे आजोबा दत्तात्रेय यांनी सांगितले.