येथे भरते मेंदूची कार्यशाळा, झेडपीच्या शिक्षकाचा भन्नाट उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 11:27 PM2019-05-01T23:27:08+5:302019-05-02T06:18:58+5:30
अभिनव उपक्रम : जि.प. गोवणे शाळेतील शिक्षक विजय पावबाके यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम
बोर्डी : शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असून या काळात त्यांना खेळ व गमती-जमतीच्या माध्यमातून बुद्धिला खुराक मिळायला हवा. तरच त्यांच्या मेंदूला व्यायाम मिळून त्यांची बुद्धी तल्लख होईल या कल्पनेतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक गोवणे शाळेतील शिक्षक विजय पावबाके यांनी मेंदूची व्यायाम कार्यशाळा या नाविन्यपूर्ण उपक्र माचे आयोजिन केले होते. या वैविध्य आणि चमत्कृतीपूर्ण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
या अभ्यासवर्गात पाच त्रिकोण, एक चौकोन आणि एक समभूज चौरस अशा सात भौमितिक आकृत्यांपासून सहा हजाराहून अधिक आकार निर्माण करण्याचे कसब पावबाके यांनी विद्यार्थ्यांंना शिकविले. या सात आकृत्यांच्या कोडयास टनग्राम असे संबोधले जाते असे ते म्हणाले. तर टनग्राम हा चीनी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सात कौशल्य असा आहे. हे एक विच्छेदक कोडे आहे, ज्यामध्ये सात आकार असून, त्याला टॅन्स म्हणतात. त्यापासून हजारो आकार तयार करण्यासाठी एकत्र वापरातून विशिष्ट आकार निर्माण होतो.
हा उपक्रम सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. सात आकार हलवता तसेच फिरवता येऊन कोडे पूर्ण करताना विद्यार्थ्यांच्या मेंदूला खरा व्यायाम मिळतो. शिवाय या सात भौमितिक आकारापासून अंक अक्षरे, प्राणी, पक्षी, घरे, विविध नक्षी आदी हजारो आकार कल्पकता वापरल्यास निर्माण करता येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे काय करू आणि काय नको अशीच काहीशी स्थिती विद्यार्थ्यांची होत आहे.
या आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना हा खर्च परवडावा म्हणून हे कोडे वह्यांच्या पुठ्यांपासून विनाखर्चिक बनविण्याचे प्रात्यक्षिक देतानाच ते कशा पद्धतीने खेळायचे हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांंना केले जाते.
कोण आहेत विजय पावबाके? त्यांचे कार्य काय?
पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात प्रयोगशील शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. आदिवासी पाड्यावर जि. प. शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मागे टाकले आहे. युनेस्को क्लबची शाळेत स्थापना केली, फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्ससाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, फास्टेस्ट अरेंजमेंटचा एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि इकोफ्रेंडली पेनसाठी ग्लोबल रेकॉर्ड त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नावावर असून पाठंतराचे चार रेकॉर्ड या मुलीच्या नावावर आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्र मात त्यांचा सहभाग असतो पर्यावरण विकास संस्थेचे ते तालुका अध्यक्ष आहेत.
समस्या-निराकरण तार्किक विचार कौशल्य, अवधारणात्मक तर्क, निर्मितीक्षमता आणि समन्वय, सममिती, क्षेत्र, परिमिती आणि भूिमती सारख्या अनेक गणितीय संकल्पना विकिसत करण्यासाठी या कार्यशाळेचा लाभ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भूमिती ही कंटाळवाणी नसून सर्जनशील आणि मजेदार आहे याची जाणीव विद्यार्थ्यांंना झाली. -विजय पावबाके, शिक्षक, जि. प.प्राथमिक शाळा गोवणे